माळेगाव: पाहुणेवाडी (ता. बारामती) येथील भंगार विकणार्या कुटुंबातील हरिश परमेश्वर उगाडे व शिवम परमेश्वर उगाडे या दोघा भावांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. त्यांची महसूल सहायकपदी निवड करण्यात आली आहे. एनटीबी प्रवर्गात हरिशने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. शिवमने हॉटेलमध्ये काम करत राज्यात 65 वा क्रमांक मिळविला. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल राजहंस संकुल व पाहुणेवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचा सन्मान केला.
हरिश व शिवम यांनी पाटस येथील नागेश्वर विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आई-वडिलांबरोबर भंगार विक्रीचे काम करत दोघा भावांनी मुक्त विद्यापीठातून पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सन 2023 मध्ये लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत हरिश व शिवम यांनी यश संपादन केले.
याबद्दल पाहुणेवाडी गावच्या वतीने राजहंस संकुलमध्ये जिल्हा बँकेचे संचालक रणजित अशोकराव तावरे, ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन मारुतराव तावरे, डॉ. सचिन विश्वनाथ बुरुंगले, दादा सखाराम जगताप, केशवराव शंकरराव तावरे, सचिन बाळासाहेब खुडे, लालासाहेब यादव, पोपटराव उगाडे, अमोल सुभाषराव तावरे, अमित विष्णू तावरे आदींच्या उपस्थितीत या दोघा भावांचा सत्कार करण्यात आला.