नारायणगाव(पुणे); पुढारी वृतसेवा : नारायणगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी या ठिकाणी बुधवारी (दि. २७) अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्यास ताब्यात घेऊन विदेशी मद्याच्या बाटल्या, वाहतुकीस वापरण्यात आलेली कार व मोबाईल असा एकूण १० लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही माहिती उत्पादन शुल्क निरीक्षक सुनील गायकवाड व दुय्यम निरीक्षक महिपाल धोका यांनी दिली. सतीश नानाभाऊ रणपिसे (वय ३९, रा. पोंदेवाडी, ता. आंबेगाव) असे उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावाचे हद्दीत एकजण अवैद्य दारूची वाहतूक करणार असल्याची खात्रीलायक माहिती या विभागाला मिळाली. त्यानंतर निरीक्षक सुनील गायकवाड यांनी भरारी पथकातील निरीक्षक समीर पाटील, दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, दुय्यम निरीक्षक महिपाल धोका, सत्यविजय ठेंगडे, प्रवीण देशमुख, जवान सर्वश्री दाते, संदीप सुर्वे, मुकुंद पोटे, शरद हांडगर यांचे पथक तयार करून रात्रीच्या वेळी सापळा रचला.
सापळा रचलेल्या जागेवर टाटा कंपनीची टियागो मॉडेलची गाडी (एमएच १४ केडब्ल्यू ८४१०) आली. हे वाहन ताब्यात घेऊन उत्पादन शुल्क विभागाने तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्य निर्मित महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले विदेशी मद्यसाठ्यात विविध कंपनीच्या ७५० एमएलच्या १ लाख ६२ हजार रुपये किमतीच्या २४३ बाटल्या मिळून आल्या. उत्पादन शुल्क विभागाने मद्य वाहतुकीस वापरण्यात आलेली कार, मोबाईल असा एकूण १० लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस घोडेगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक महिपाल धोका करत आहेत.
हेही वाचा