पुणे

Dr. Jayant Narlikar : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नारळीकर यांच्यावर अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतले अंत्यदर्शन

डॉ. नारळीकर यांचे पार्थिव आयुकातील सभागृहात ठेण्यात आले. येथे अर्ल्बट आईनस्टाईन, न्युटन, भास्कराचार्य या शास्त्रज्ञांचे पुतळे आहेत. हा परिसर गर्दीने भरून गेला होता.

पुढारी वृत्तसेवा

Scientist Dr Jayant Narlikar cremated with full state honours

पुणे : जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर बुधवारी (दि. 21) पुणे शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी आयुका या संस्थेत येऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.

डॉ. नारळीकर यांचे पार्थिव बुधवारी सकाळी त्यांनीच 1988 मध्ये स्थापन केलेल्या आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका) येथे आणण्यात आले. तेथे संस्थेतील प्राध्यापकांसह आजी-माजी विद्यार्थी आणि डॉ. नारळीकर यांच्या दोन मुली गिरीजा आणि लिलावतीसह इतर नातेवाईक आले होते. त्यांचे पार्थिव आयुकातील सभागृहात ठेण्यात आले होते. जेथे अर्ल्बट आईनस्टाईन, न्युटन, भास्कराचार्य या शास्त्रज्ञांचे पुतळे आहेत तो परिसर सकाळपासून गर्दीने भरून गेला होता.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले अंत्यदर्शन

सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आयुका संस्थेत आगमन झाले. त्यांनी डॉ. नारळीकरांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डॉ. नारळीकर यांच्या मुलींची भेट घेत सांत्वन केले. याप्रसंगी पोलीस दलाने सलामी, शोकशस्त्र तसेच बाजूशस्त्र सलामी दिली. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे शहर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते.

आयुकाला गहीवर...

डॉ. नारळीकरांच्या संकल्पनेतूनच आयुका संस्थेची इमारत साकारली. याच ठिकाणी हिरवळीवर त्यांनी थोर शास्त्रज्ञ आयझॅक न्युटन, अल्बर्ट आईनस्टाईन, भास्कराचार्य यांसह आणखी काही शास्त्रज्ञांचे पुतळे उभारले. त्या सोमरील हॉलमध्ये त्यांचे पार्थिक ठेवण्यात आले होते. प्राध्यापक, विद्यार्थी आणि त्यांच्यावर प्रेम करणारे नागरिक अंत्यदर्शन घेतल्यावर या प्रांगणातील पुतळ्यांजवळ गर्दी करून बसले होते. लहानमुलेही पुष्पहार, फुले घेऊन त्यांच्या अंत्यदर्शनाला आली होती. सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत त्यांचे पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात आले होते. देशाच्या कानाकोपर्यातून डॉ. नारळीकरांचे विद्यार्थी आणि स्नेही आले होते.

वैकुंठ स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसस्कार

दुपारी एक वाजेच्या सुमारास डॉ.नारळीकरांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. तेथे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पोलीस दलाच्या तुकडीने 21 बंदुकीतून तीन फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार झाले.

आणि दोन्ही मुलींच्या अश्रृंचा बांध फुटला...

आयुका संस्थेत मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले त्यावेळी आणि अंत्यस्कार होताच डॉ. नारळीकरांच्या दोन मुली गिरीजा आणि लीलावती यांच्या आश्रृंचा बांध फुटला. आपल्या बांबाना अखेरचा निरोप देताना त्यांना गहिवरुन आले. त्या दोघी डोळे पुसत शांतपणे खुर्चीचा आधार घेत सर्वाचा निरोप घेत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT