पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचे धुमशान सलग चौथ्या दिवशी सुरूच आहे. Pudhari Photo
पुणे

पुणे जिल्ह्यात धुवांधार, सर्व शाळा- महाविद्यालयांना आज सुट्टी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा पुणे शहर

पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचे धुमशान सलग चौथ्या दिवशी सुरूच आहे. अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज (गुरुवारी) सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

पुणे शहरात बुधवारी दुपारनंतर दोन ते तीन तासांत १२४ मिमी पाऊस पडला. या तीन तासांत वर्षाच्या सरासरीच्या १८ टक्के जास्त पाऊस पडल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दरम्यान, उद्याही (दि. २६) शहरात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात पावसाची जोरदार बॅटिंग

पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी दुपारनंतर पावसाने जोरदार बॅटिंग केली. सुमारे सलग दोन पडणाऱ्या मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. शहरात बुधवारी दुपारी सुमारे दोन तासात १२७.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या बहुतांश ग्रामीण भागांत मागील तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली.

बुधवारी (दि. २५) या पावसाने दमदार बॅटिंग केली. काही ठिकाणी हा पाऊस सुखावह, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेणारा ठरला आहे. या पावसाने काढलेली बाजरी, काढणीस आलेली बाजरी, मका आदींचे मोठे नुकसान झाले आहे. यासह तरकारी आणि ऊस पिकालादेखील या पावसाचा फटका बसला. काही ठिकाणी रस्त्यावर पावसाचे तळे साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेक नागरिकांच्या घरांतदेखील पाणी शिरून नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

धरणांतून विसर्ग; सतर्कतेचा इशारा

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अगोदरच शंभर टक्के भरलेल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. यामुळे नद्यांना पूर आले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT