पुणे : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राज्यातील शाळांच्या संचमान्यतेबाबत शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार २० ऑक्टोबरपर्यंत 'युडायस प्लस प्रणाली'वर नोंद असलेले विद्यार्थी विचारात घेऊन त्यापैकी संचमान्यता करण्याच्या दिवसापर्यंतची आधार वैध विद्यार्थिसंख्या संचमान्यता निर्धारणासाठी विचारात घेतली जाणार आहे. शिक्षण विभागाने याबाबत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत.
संचमान्यतेसाठी ३० सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. परंतु, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या संचमान्यतेबाबत युडायस प्लस प्रणालीवर नोंद असलेली विद्यार्थिसंख्या, आधार वैध विद्यार्थिसंख्या विचारात घेऊन संचमान्यता उपलब्ध करून देण्याबाबत सुधारित दिनांक निश्चित करून देण्याबाबत १४ ऑक्टोबर रोजी शासनाकडे विनंती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर संचमान्यतेबाबतचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, तांत्रिक अडचणींमुळे संचमान्यतेच्या तारखेला मुदतवाढ देऊन ती २० ऑक्टोबर करण्यात आली. त्यानुसार २० ऑक्टोबरपर्यंत आधार वैध होऊन युडायस प्लस प्रणालीवर नोंदणी झालेले विद्यार्थी आता संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.