पुणे: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने शालेय बस वाहतुकीसंदर्भात नवीन कडक नियम लागू केले आहेत. मागील शैक्षणिक वर्षात घडलेल्या काही दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच हे खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. याअंतर्गत शालेय बसचालकांची पार्श्वभूमी कसून तपासली जाणार असून त्यांची नियमित मद्यपान आणि औषध चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी कडक पावले उचलली आहेत. यानुसार बसचालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची सकाळी व सायंकाळी अशा दोनवेळा मद्यपान व औषध चाचणी करणे अनिवार्य असणार आहे. या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. या नवीन नियमांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल आणि अनुचित प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
* नियमित चाचणी : शालेय बसचालकांची दर आठवड्याला मद्यपान व औषध चाचणी केली जाईल.
* पाश्वभूमी तपासणी : चालकांची सखोल पार्श्वभूमी तपासणी अनिवार्य असेल.
* अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही : शालेय बसमध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही.
* खासगी वाहनांसाठी सूचना : खासगी वाहनांतून येणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवणे बंधनकारक आहे.
* पालकांची जबाबदारी : पालकांनीही खासगी चालकांची वैयक्तिक माहिती स्वतःकडे ठेवावी. त्यांची पार्श्वभूमी तपासावी आणि त्यांच्या भूतकाळातील वाहन चालवण्याच्या सवयी व अपघातांची माहिती घ्यावी.
* शाळा व्यवस्थापनाची भूमिका : खासगी वाहतूक वापरणार्या पालकांकडून चालकाच्या पडताळणी आणि ओळख तपशिलांची माहिती शाळा व्यवस्थापनाने घेणे आवश्यक आहे.