Scholarship paperwork burden
गणेश खळदकर
पुणे: कृषी, आरोग्य, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रे जमा करावी लागतात तसेच अपलोडदेखील करावी लागतात. परंतु, संबंधित कागदपत्रांची संख्याच एवढी असते की प्रवेश नको; परंतु कागदपत्रे आवरा, असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेल, तंत्रशिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालय, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आदींमार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यामध्ये प्रवेशासाठी विविध कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. (Latest Pune News)
त्यामुळे संबंधित कागदपत्रे कमी करण्याची गरज विद्यार्थी तसेच पालकांनी व्यक्त केली आहे. तसेच, मोजकीच कागदपत्रे घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा. प्रवेश झाल्यानंतर आवश्यकता असेल तर अन्य कागदपत्रांची मागणी करण्यात यावी. प्रवेशासाठी एक पोर्टल तयार करण्यात येऊन या पोर्टलवर दहावीपासूनच विद्यार्थ्यांचे कागदपत्रांचे रेकॉर्ड तयार करण्यात यावेत.
या पोर्टलवरील कागदपत्रे आवश्यक त्या ठिकाणी संबंधित प्राधिकरणांना उपलब्ध करण्याची सोय करण्यात यावी; जेणेकरून केवळ कागदपत्रांवरून विद्यार्थ्यांना प्रवेशाला मुकण्याची वेळ येणार नाही तसेच कागदपत्रे गोळा करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची होणारी आर्थिक हानी होणार नाही. त्यामुळे संबंधित प्राधिकरणांकडून याचा गांभीर्याने विचार करून कमीत कमी कागदपत्रांमध्ये प्रवेश तसेच शिष्यवृत्ती उपलब्ध होईल यासाठीची यंत्रणा विकसित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
शिष्यवृत्तीसाठी पुन्हा कागदपत्रांची आवश्यकता कशाला..?
विद्यार्थी व्यावसायिक किंवा अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असताना सर्व आवश्यक कागदपत्रे उच्च शिक्षण संस्थांमध्ये ऑफलाइन देत असतात. तसेच सीईटी सेलच्या वेबसाइटवर अपलोड देखील करीत असतात. अशावेळी संबंधित कागदपत्रे महाविद्यालयांकडून सीईटी सेलला देणे गरजेचे आहे.
तसेच सीईटी सेल किंवा तंत्रशिक्षण संचालनालयाकडून समाजकल्याण विभाग किंवा अन्य शिष्यवृत्ती दिली जाणार्या विभागांकडे देणे गरजेचे आहे. परंतु, हे न करता विद्यार्थ्यांकडून वारंवार शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे मागविण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप होत असतो. त्यामुळे प्रवेशासाठी एकदा कागदपत्रे देण्यात आल्यानंतर पुन्हा शिष्यवृत्तीसाठी पुन्हा कागदपत्रांची आवश्यकता आहे का? असा प्रश्न देखील विद्यार्थी-पालकांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थ्यांना या अडचणींचा करावा लागतो सामना
प्रवेशासाठीची कागदपत्रे गोळा करताना विद्यार्थ्यांची दमछाक होते
कागदपत्रांसाठी सेतू केंद्रांच्या चकरा माराव्या लागतात
कागदपत्रांसाठी सेतू केंद्रांकडून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट
ठरावीक कालावधीतच कागदपत्रे जमा करण्याचे विद्यार्थी-पालकांसमोर मोठे आव्हान
उच्च शिक्षण संस्थांकडून एखादे कागदपत्र नसले तरी होते अडवणूक
कागदपत्रांअभावी प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येते
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
1) जात प्रमाणपत्र 2) जातवैधता प्रमाणपत्र 3) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र 4) डोमिसाईल प्रमाणपत्र 5) उत्पन्नाचे प्रमाणपत्र 6) ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र 7) अपंगत्वाचे प्रमाणपत्र 8) आधार क्रमांक 9) बँक खाते 10) दहावी-बारावीची प्रमाणपत्रे 11) प्रथम वर्ष, व्दितीय वर्ष, तृतीय वर्ष पदवी प्रमाणपत्रे यांसह अन्य कागदपत्रे आवश्यक असतात.