पुणे: कमी शुद्धतेचे तसेच बनावट सोने तारण ठेवून स्टेट बँक ऑफ इंडियाची तब्बल चार कोटी 23 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, पर्वती पोलिसांनी दोन सराफांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना 26 मे 2025 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्दमधील एसबीआय शाखेत घडली. याबाबत मनोज कुमार (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोक्ष जैन, चिराग जैन आणि इतर 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिंगणे येथील एसबीआय शाखेत व्यवस्थापक आहेत. मोक्ष जैन आणि चिराग जैन यांची बँकेकडून सोन्याचे मूल्यांकन करणारे म्हणून नियुक्ती केली होती. आरोपींनी बँकेत कमी शुद्धतेचे तसेच बनावट सोने तारण ठेवले. हे सोने अस्सल आणि उच्च शुद्धतेचे असल्याचे खोटे प्रमाणपत्र मोक्ष आणि चिराग जैन यांनी दिले.
या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे 13 आरोपींनी 26 कर्ज प्रकरणांद्वारे चार कोटी 44 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यातून एसबीआयची चार कोटी 23 लाख चार हजार 752 रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ करत आहेत.
संशयातून उघडकीस आले प्रकरण
मोक्ष आणि चिराग जैन यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांबाबत बँकेला संशय आला होता. त्यानंतर बँकेने तारण ठेवलेल्या सोन्याचे लेखापरीक्षण केले. या तपासणीत तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर मूल्यांकन करणारे सराफ व्यावसायिक आणि संबंधित कर्जदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.