पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत शनिवारी झालेला गोंधळ, हमरीतुमरीनंतर रविवारीही घमासान चर्चा झाली. अधिसभा सदस्यांना बोलू न देणे, अर्थसंकल्पातील त्रुटींवरून विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. विद्यापीठाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असूनही विद्यार्थी, शिक्षण, संशोधनाविषयी अधिसभेत चर्चाच होत नाही. अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुरेसा निधी दिलेला नाही, याबाबत अधिसभा सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले.
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत 2025 - 26 या आर्थिक वर्षासाठी एकूण 566 कोटी रुपये जमा आणि 648 कोटी रुपये खर्च असलेला अर्थसंकल्प मांडण्यात आला. यंदा अर्थसंकल्पात 82 कोटी रुपयांची तूट दाखवण्यात आली आहे. अधिसभा सदस्यांनी मांडलेल्या कपात सूचनांमध्ये डॉ. विनायक आंबेकर यांनी कुलगुरू निधीत सुचवलेली 25 लाख रुपयांची कपात विद्यापीठ प्रशासनाला मान्य करावी लागली. अनेक कपात सूचनांवर साधक-बाधक चर्चा झाल्यानंतर अखेर अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
अधिसभा सदस्य निवडून आलेले आहेत. अधिसभा हे समाजाचे प्रतिबिंब आहे. कुलगुरू, प्र. कुलगुरू, कुलसचिव यांनी विसंवाद दूर करण्यासाठी काम करावे, असे अधिसभा सदस्य बाळासाहेब सागडे यांनी सांगितले. आंदोलन करायचे असल्यास पूर्वकल्पना द्यायची, असे विद्यापीठाचे परिपत्रक आहे. शनिवारी झालेल्या आंदोलनाची पूर्वकल्पना होती का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
अशा प्रकारे सभागृहात येऊन आंदोलन केले जाणार असल्यास अधिसभेला अर्थ काय, कुलगुरूंनी कठोर भूमिका घ्यावी, अशी भूमिकाही मांडण्यात आली. याबाबत बोलताना कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, विद्यापीठ प्रशासन आणि अधिसभा सदस्य यांच्यात सुसंवाद राहण्यास प्राधान्य दिले जाईल. चुकीच्या बाबी समोर आणण्याचा सदस्यांना अधिकार आहे. कालचा झालेला प्रकार विसरून आपण सगळे मिळून विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी प्रयत्न करूया.
अधिसभेत विद्यार्थ्यांसाठी बोलले पाहिजे, परंतु त्यांच्याविषयी चर्चाच होत नाही. वैयक्तिक हेवेदावे विसरून विद्यार्थ्यांसाठीच चर्चा झाली पाहिजे, असे स्पष्ट मत अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस यांनी मांडले. विद्यार्थी, संशोधन, शिक्षण यावर चर्चा होत नाही. आरोप-प्रत्यारोप होत राहणे योग्य नाही, असे बाकेराव बस्ते यांनी नमूद केले. संशोधनाला चालना देण्यासाठी, गुणवत्ता उंचावण्यासाठी निधी देण्याची मागणी अधिसभा सदस्य अशोक सावंत यांनी केली.
शिष्यवृत्तींसाठीच्या निधीचा वापर होत नसल्याच्या मुद्द्यावर प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी स्पष्टीकरण दिले. ’विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही,’ असा नियम होता. त्यामुळे विद्यापीठाच्या योजनांसाठी विद्यार्थी तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरत नव्हते. आता योजनेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. त्यामुळे आता अधिकाधिक विद्यार्थी योजनेला पात्र ठरतील. त्यामुळे योजनेतील निधी वापरला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. विनायक आंबेकर म्हणाले, विद्यापीठ दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना मूळ गोष्टींकडे लक्ष देत नाही, असे तरतुदी पाहिल्यानंतर लक्षात येते. सदस्यांना किमान आठ दिवस अगोदर अर्थसंकल्प वाचण्यासाठी मिळायला हवा. ऐनवेळी अर्थसंकल्पाची प्रत मिळाल्यानंतर बदल सूचविता येत नाही.
अद्वैत बंबोली म्हणाले, अर्थसंकल्पातील काही मुद्दे पाहिल्यानंतर आश्चर्यकारक बदल दिसले. दरवेळी आम्ही प्रशासनाला चुका लक्षात आणून देतो. परंतु, प्रशासन दुरुस्ती करत नाही. मागच्याच अर्थसंकल्पातील काही तरतुदी आणल्या आहेत. सचिन गोरडे म्हणाले, ग्रामीण विद्यार्थ्यांवर विद्यापीठ केवळ 3 टक्के निधी खर्च करते, हे खेदजनक आहे. उपकेंद्रांना कमी निधी दिला जातो. त्यामुळे उपकेंद्रातील कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. या अर्थसंकल्पात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचा प्रभाव दिसत नाही.
भरतीची कार्यवाही लवकरच...
विद्यापीठात रिक्त असलेल्या अधिष्ठाता, कुलसचिव, प्राध्यापक भरतीची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. तसेच पूर्णवेळ प्लेसमेंट ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहे, असे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.
पदोन्नतीसाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप...
प्राध्यापकांच्या कॅस संदर्भातील चर्चेदरम्यान सहसंचालक कार्यालयात पदोन्नतीसाठी पैसे मागितले जातात. प्राध्यापकांना पदोन्नती, पगारवाढीसाठीही पैसे खर्च करावे लागतात, असा आरोप अधिसभा सदस्य सचिन गोरडे पाटील यांनी केला.
पुढील तीन महिन्यांत प्लेसमेंट सेल पूर्ण क्षमतेने सुरू करणार...
विद्यापीठाचा प्लेसमेंट सेल बंद अवस्थेत असल्याचे अधिसभा सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. प्लेसमेंट सेलमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. या संदर्भात दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे सदस्यांनी प्रशासनाला सांगितले. याबाबत कुलगुरू व प्र-कुलगुरू यांनी पुढील तीन महिन्यांत पूर्ण क्षमतेने प्लेसमेंट सेल कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, ’प्लेसमेंट सेलचे यापूर्वीच्या संचालकांनी उत्कृष्ट काम केले. काही कारणास्तव या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नाही. प्लेसमेंट सेलच्या समस्या तातडीने सोडविल्या जातील. पुढील तीन महिन्यांत प्लेसमेंट सेल पूर्ण क्षमतेने सुरू केला जाणार आहे.