रँकिंग सुधारण्यासाठी विद्यापीठ ‌‘ॲक्शन मोड‌’वर! आवश्यक बदलांना विद्यापीठाकडून सुरुवात Pudhari
पुणे

Pune University Ranking: रँकिंग सुधारण्यासाठी विद्यापीठ ‌‘ॲक्शन मोड‌’वर! आवश्यक बदलांना विद्यापीठाकडून सुरुवात

निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा रोडमॅप तयार

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फेमवर्क अर्थात एनआयआरएफ रँकिंग-2025 मध्ये स्टेट युनिव्हर्सिटी कॅटेगिरीमध्ये मागील वर्षी तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला यंदा पहिल्या दहा विद्यापीठांच्या यादीमध्येसुद्धा स्थान मिळाले नाही.

विद्यापीठ ओव्हर ऑल रँकिंगमध्ये 91 व्या, विद्यापीठांच्या श्रेणीत 56 व्या, आणि सार्वजनिक राज्य विद्यापीठांमध्ये 11 व्या स्थानावर घसरले. त्यामुळे खडबडून जागे झालेले विद्यापीठ प्रशासन सर्वच रँकिंग सुधारण्यासाठी ॲक्शन मोडवर आले असून, रँकिंगच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाने रोडमॅप तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात शिक्षक भरती, संशोधन आणि पब्लिक पर्सेप्शनवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Pune News)

अन्य रँकिंमध्ये सुधारणा आणि एनआयआरएफमध्ये घसरण का?

जवळपास दहा संस्थांकडून उच्च शिक्षण संस्थांची शिक्षणातील क्रमवारी जाहीर करण्यात येते. यामध्ये काही रँकिंगमध्ये विद्यापीठाचा दर्जा वाढलेला दिसतो. परंतु, एनआयआरएफ रँकिंगमध्ये मात्र हा दर्जा घसरलेला पहायला मिळतो. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक संस्था विद्यापीठाकडे माहिती मागवत नाहीत. तर विद्यापीठाच्या उपलब्ध संकेतस्थळावरील माहिती गोळा करूनच त्यांच्याकडून रँकिंग जाहीर करण्यात येते. त्यामुळे संबंधित तफावत दिसत असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

30 सप्टेंबरच्या अधिसभेत होणार जोरदार चर्चा

येत्या 30 सप्टेंबरला विद्यापीठात अधिसभेचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच एनआयआरएफ रँकिंग जाहीर झाले असून, यामध्ये विद्यापीठाची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे अधिसभेत यावर वादळी चर्चा केली जाणार आहे. विद्यापीठ प्रशासन अधिसभा सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरदायी असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचादेखील कस लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाच्या प्रभावी जनसंपर्कावरही प्रशासन काम करणार

खासगी विद्यापीठांकडून विविध बातम्या प्रसारमाध्यमे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांना दिल्या जातात. समाजमाध्यमांवरही सक्रिय असतात. तसेच त्यांच्याविरोधात फारशा बातम्या येत नाही. याच्या नेमके उलटे चित्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाबतीत दिसून येते. सार्वजनिक विद्यापीठ असल्यामुळे सकारात्मक बातम्यांपेक्षा नकारात्मक बातम्या जास्त येतात.

त्या बातम्यांची वस्तुस्थिती तसेच सकारात्मक बातम्या देण्यासाठी आवश्यक यंत्रणा विद्यापीठाकडे नसल्यामुळे पब्लिक पर्सेप्शन या निकषामध्ये विद्यापीठाला फार कमी गुण मिळतात. त्याचादेखील विद्यापीठाच्या रँकिंगवर परिणाम होतो. यामध्येदेखील चांगला बदल कसा करता येईल, यावर विद्यापीठ प्रशासन सध्या काम करत आहे.

विद्यापीठाने एनआयआरएफमधील विविध निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध अधिकारमंडळांशी चर्चा केली आहे. त्यानुसार संबंधित निकषांमध्ये बदल करण्यासाठी आता ठोस पावले उचलली जाणार आहेत.
- डॉ.सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांसमोर सगळ्या रँकिंग परिणामांची चर्चा झाली असून, सर्व सदस्यांचे मत विचारात घेऊन सर्व रँकिंगमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून दीर्घकालीन योजना राबविणे सुरू करण्यात आले आहे. याचा सकारात्मक परिणाम येत्या काळात दिसणार आहे.
- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT