पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प 4 कोटी 32 लाख 71 हजार रुपयांच्या तुटीसह सादर करण्यात आला. अर्थसंकल्पानुसार विद्यापीठाचे एकूण अपेक्षित उत्पन्न 619 कोटी रुपये असून, खर्चाचा अंदाज 624 कोटी रुपये इतका आहे. निर्माण झालेली तूट विद्यापीठाच्या निधीवर टाकण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पन्नवाढ मर्यादित राहिली आहे. अर्थसंकल्पातील नियमित खर्चामध्ये वेतन, निवृत्तिवेतन, परीक्षा व मूल्यमापन आणि प्रशासकीय खर्च यांचा मोठा वाटा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात संशोधन आणि नवोपक्रमावर विशेष भर देण्यात आला आहे.
युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रिसर्च फंड, संशोधन संवर्धन योजना, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस आणि आंतरराष्ट्रीय अतिथी प्राध्यापक योजना, यांसाठी निधी देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांसाठी माहिती तंत्रज्ञान सुविधा, स्मार्ट कॅम्पस, सीसीटीव्ही देखरेखव्यवस्था आणि विभागांचे आधुनिकीकरण, यासाठी तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी कल्याणासाठी सुरक्षा विमा, कौशल्य विकास, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम तसेच समर्थ भारत अभियान यांसाठीही निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
विद्यापीठाची खरी तूट 82 कोटींवर
यंदा विद्यापीठाने 619 कोटी जमेचा आणि 624 कोटी खर्चाचा अर्थसंकल्प मांडून वेल्फेअर ॲण्ड ऑदर फंडसाठी 78 कोटी रुपयांची वेगळी तरतूद केली आहे. त्यामुळे दिसताना 4 कोटी 32 लाख 71 हजार रुपयांची तूट दिसत असली तरी प्रत्यक्षात ही तूट 82 कोटी 32 लाख 71 हजारांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात देखील 82 कोटी 39 लाख 29 हजारांची तूट दाखविण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.
अर्थसंकल्प एका नजरेत
उत्पन्न : 619 कोटी रुपये
खर्च : 624 कोटी रुपये
तूट : 4 कोटी 32 लाख रुपये
तुटीचा भार : विद्यापीठ निधीवर
खर्चाचे प्रमुख घटक
वेतन व निवृत्तिवेतन खर्च
परीक्षा व मूल्यमापन
प्रशासकीय खर्च
शैक्षणिक विभागांचा खर्च
प्राधान्यक्रम
संशोधन व नवोपक्रम
पायाभूत सुविधा
विद्यार्थी कल्याण
तंत्रज्ञानाधारित कॅम्पस