दीपेश सुराणा :
पिंपरी : महापालिकेच्या 64 इमारतींवर सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आले आहेत. त्याची क्षमता सुमारे 1.2 मेगावॅट इतकी आहे. त्या माध्यमातून दररोज सरासरी साडेचार हजार युनिट विजेची बचत होत आहे. त्याचप्रमाणे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डीतील इमारतीवर तसेच परिसरातही सौरऊर्जा पॅनेल बसविलेले आहे. त्या माध्यमातून दिवसाला 250 युनिट वीजेची बचत होत आहे.
कोठे आहेत सौरऊर्जा पॅनेल ?
महापालिकेच्या़ वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका इमारत भवन (170 किलो वॅट), निगडी-प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्र (314 किलो वॅट), पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (147 किलो वॅट), अंकुशराव लांडगे नाट्यगृह (136 किलो वॅट) आदी प्रमुख ठिकाणी सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आले आहेत. त्याशिवाय, विविध क्षेत्रीय कार्यालये, महापालिका शाळा इमारत, स्मशानभूमी, रुग्णालये, दवाखाने, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, विद्युतदाहिनी, स्मशानभूमी, अग्निशामक दलाचे कार्यालय अशा एकूण 64 ठिकाणी सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाकळे यांनी दिली. तर, पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयाच्या छतावर तसेच, इमारतीजवळ सौरऊर्जा पॅनेल बसविले असल्याची माहिती पीएमआरडीएच्या अधिकार्यांनी दिली. त्याची एकूण क्षमता 100 किलो वॅट इतकी आहे.
लाखो रुपयांची वीज बचत
महापालिकेच्या वतीने 64 इमारतींवर बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा पॅनेलच्या माध्यमातुन दररोज सरासरी 4 हजार 560 युनिट इतकी वीज बचत होत आहे. तर, पीएमआरडीएच्या आकुर्डीतील इमारतीत दररोज 250 युनिट इतकी वीज बचत होत आहे. नेट मीटरिंग पद्धतीनुसार महावितरणकडून एकूण वीज बिलात युनिटसाठी निश्चित दरानुसार ही रक्कम समायोजित केली जाते. त्यामुळे महापालिका आणि पीएमआरडीएच्या वीज बिलात वार्षिक लाखो रुपयांची बचत होत आहे.
नेट मीटरिंग पद्धत म्हणजे काय ?
नेट मीटरिंगमध्ये इन्वर्टर, ट्रान्सफार्मर आणि विद्युत मीटर यांच्या साहाय्याने घराच्या किंवा एखाद्या संस्थेच्या छतावर सोलर पॅनेल्स लावले जातात. या पॅनेल्सच्या माध्यमातून वीज निर्मिती होते. सौरऊर्जा निर्मिती झाल्यानंतर आवश्यकतेनुसार त्याचा घरासाठी किंवा संस्थेसाठी वापर करून अतिरिक्त वीज नेट मीटरिंगच्या माध्यमातून महावितरणला परत करता येते. एका सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे एक हजार युनिट वीज निर्मिती होत असेल आणि नियमित वीज वापर 200 युनिट असेल तर उर्वरित 800 युनिट वीज महावितरणला विकता येते.