भिगवण: मासेमारीवरच आमचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, या व्यवसायात गुन्हेगारी बोकाळली आहे. सामान्य मच्छीमार दहशतीच्या छायेत आहे. त्यामुळे अवैद्य मासेमारीस प्रोत्साहन देणार्या ‘आका ला रोखा आणि उजनीला बीड होण्यापासून वाचवा’ असा टोहो पिढीजात व धरणग्रस्त मच्छीमारांनी फोडला. त्यावर वडाप व पंड्याच्या साहाय्याने अवैध मासेमारी करणार्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस व जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
भोई व मच्छीमारांच्या निर्माण झालेल्या समस्या जाणून घेण्यासाठी गुरुवारी (दि.27) भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी उपस्थित मच्छीमारांनी अन्यायाचा पाढा वाचला. मच्छीमारांच्या व्यवसायात गुन्हेगारीची पाळेमुळे किती घट्ट होऊ लागली याची माहिती या वेळी देण्यात आली.
गेली 28 वर्ष अवैध मासेमारी व मत्स्यबीज न सुटल्याने मत्स्यसंपदा व जैविक साखळी धोक्यात आली होती. सुमारे 50 हुन अधिक माशांच्या जाती दुर्मीळ व नामशेष झाल्या होत्या. त्यामुळे स्थानिक पिढीजात व धरणग्रस्त मच्छीमारांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला होता. दुसर्या बाजूने प्रदूषणातही वाढ झाली आहे.
ही बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 2024 पासून धरणात शासनामार्फत मत्स्यबीज सोडण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. तसेच सोडलेले मत्स्यबीज आणि इतर प्रजातींचे संवर्धन होण्यासाठी वडाप व पंड्याच्या साहाय्याने मासेमारीवर बंदी घातली. याचा परिणाम यंदा मत्स्य उत्पादन वाढीवर झाला.
असे असताना पाणी पातळी कमी होऊ लागताच वडाप व पंड्याच्या साहाय्याने दररोज 20 ते 40 टन अवैध मासेमारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे मत्स्य उत्पादन घटून मच्छीमार देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
अवैध मासेमारीला पाठबळ देणार्या आकावर गुन्हा दाखल कारण्याची मागणी या वेळी एकमुखाने करण्यात आली. गुन्हेगारांना हाताशी धरून अवैध मासेमारी सुरू आहे. त्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका या वेळी घेण्यात आली. अवैध मासेमारीला विरोध करणार्यांना धमक्या, शिवीगाळ, मासळी बाजारात येऊ न देण्याचा धमक्या देण्यात येत असल्याची तक्रार या वेळी करण्यात आली.
सहायक पोलिस निरीक्षक महांगडे व जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता एन.एम.खाडे यांनी वडाप व पंड्याच्या साहाय्याने मासेमारी करणार्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. तसेच पोलिस, जलसंपदा, मत्स्यव्यवसाय, महसूल व प्रदूषण मंडळाच्या वतीने संयुक्त कारवाई सुरू करू, असे सांगितले. उजनीत मासेमारीवरून जर कोणता अनुचित प्रकार घडला तर त्या पदाधिकार्याला जबाबदार धरून कारवाई केली जाईल असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.