पुणे

बारामती : देशाला निर्यातदार बनविल्याचे समाधान : ज्येष्ठ नेते शरद पवार

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : मी केंद्रात कृषिमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी माझ्याकडे एक फाईल पाठवली. त्यात देशात केवळ चार आठवडे पुरेल एवढाच गहू शिल्लक असल्याचे नमूद होते. माझ्या देशातील भुकेचा प्रश्न सोडविण्यासाठी परदेशातून धान्य आणावे लागते, ही स्थिती बदलायची ठरवली. त्यात पुरेपूर यश मिळवत काही वर्षांत देशाला निर्यातदार बनविले, याचे समाधान असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नमूद केले.

येथे विद्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित तारांगण युवा महोत्सवात गदिमा सभागृहात विद्यार्थ्यांनी पवार यांची मुलाखत घेतली. पवार यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. लातूरचा भूकंप की बॉम्बहल्ला, यापैकी जास्त आव्हानात्मक काय होते? या प्रश्नावर पवार म्हणाले की, लातूरचा भूकंप झाला तेव्हा गणपती विसर्जन झाले होते. मी त्या दिवशी मध्यरात्री 3 वाजता झोपायला गेलो. त्यानंतर 15 मिनिटांत माझ्या रूमच्या खिडक्या वाजल्या. मी म्हटले भूकंप झाला. मी कोयनाला फोन केला.

ते म्हणाले की, येथे भूकंप झाला नाही, लातूरला भूकंप झाला. सकाळी मी 6 वाजता लातूरला पोहचलो. त्या परिसरात 9 हजार लोक मृत पावले, तर 1 लाख घरे पडली. त्या वेळी मी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि मदत मागितली. 3 तासांत मदत यायला सुरुवात झाली. 15 दिवस मी लातूरला राहिलो. जागतिक बँकेने मला अमेरिकेत बोलावले आणि भाषण द्यायला सांगितले.

बॉम्बहल्ला होण्याआधी सहा दिवस मी पदभार स्वीकारला होता. त्याआधी संरक्षणमंत्री होतो. धार्मिक दंगे करण्याचा उद्देश पाकिस्तानचा होता. 11 ठिकाणी स्फोट झाला, ती ठिकाणे हिंदुबहुल होती. धार्मिक संघर्ष होऊ नये, यासाठी मी दूरदर्शनला गेलो. तेथे सांगितले की, 12 ठिकाणी स्फोट झाले. मुस्लिम भागात देखील स्फोट झाल्याचे सांगितले. दोन दिवसांत परिस्थिती पूर्ववत केली.

शिष्यवृत्तीचा कसा फायदा झाला? या प्रश्नावर ते म्हणाले की, शालेय जीवनात शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर सार्वजनिक जीवनात कसे काम करायचे, हे समजले. पहिल्यांदा मला मुंबईतून टोकियोला पाठविले. ती शिष्यवृत्ती मला युनोस्कोने दिली होती. त्या वेळी मला एक दिवस जपानच्या पंतप्रधानांना जवळून बघता आले. यासह अनेक देशांतील लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा मला आजही होत आहे.

लोक आस्थेने बोलतात, हीच माझी अचिव्हमेंट
राज्यात कुठेही गेलो तरी लोक आस्थेने बोलतात, ही माझी अचिव्हमेंट आहे. लोकांच्या जीवनात व राहणीमानात झालेला बदल ही आनंद देणारी गोष्ट आहे. पूर्वी पितळीत चहा मिळायचा. पुढे कप आला. पण, त्याचा कान तुटलेला असायचा. आज त्याच घरातील सून ट्रेमधून चहा घेऊन येते, हा झालेला बदल आनंद देणारा असल्याचे पवार म्हणाले.

SCROLL FOR NEXT