पुणे: महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून देशातील राजकीय गणित बदलण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) करून त्यांची संख्या वाढवण्याचा सरकारचा डाव आहे. काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध नसून, २०२३ मध्ये मंजूर झालेल्या विधेयकाची अंमलबजावणी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून करावी, अशी मागणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली.
डिलिमिटेशनच्या माध्यमातून संविधानात बदल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार विश्वजित कदम, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, २०२३ मध्ये संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडले गेले, तेव्हा काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला होता. महिला आरक्षण लागू झाले पाहिजे, ही पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. मग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी का केली नाही? आता २०२९ पासून आरक्षण लागू करण्याची संधी असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
३० तारखेला याबाबत काय निर्णय होतो, हे स्पष्ट होईल; मात्र या प्रक्रियेमागील राजकीय हेतू जनतेच्या लक्षात आला आहे. दरम्यान, महागाईमुळे सामान्य आणि मध्यमवर्गीयांचे जगणे कठीण झाले असून, २०२९ नंतर भाजप नको, असा जनतेचा निर्धार असल्याचा दावाही पाटील यांनी केला.
शहरातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली; सुरक्षेचा प्रश्न गंभीर
पुण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, शहरातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे. अमली पदार्थांचा विळखा वाढत असून, यासाठी गृहमंत्री जबाबदार असल्याची टीका करत त्यांनी महाराष्ट्राला पूर्णवेळ स्वतंत्र गृहमंत्र्यांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा केवळ जयघोष करून उपयोग नाही. भिडेवाड्याच्या कामासाठी मिळालेला निधी आणि प्रत्यक्ष खर्च पाहता सरकारची अनास्था स्पष्ट होते.