पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाबाबत ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञ समितीचा बहुप्रतीक्षित अहवाल बुधवारी रात्री उशिरा रवाना झाला. मात्र, अहवालफुटीचा धोका वाटत असल्याने अहवालाची प्रत ई-मेलवर न पाठवता विश्वासू माणसाच्या हाती पाठवल्याचे ससून प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या जगात अहवालाचा प्रवास ‘डाकिया डाक लेके गया’ असा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले नाहीत. डिपॉझिट न भरल्याने साडेपाच तास उपचारांविना ताटकळत ठेवल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणात सार्वजनिक आरोग्य विभागाची चौकशी समिती, धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती आणि मातामृत्यू अन्वेषण समिती, या तीन समित्यांनी अहवाल सादर केले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील सर्व कागदपत्रे ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञ समितीकडे सुपूर्त केली. ससूनच्या चौथ्या समितीचा अहवाल सादर झाल्यावर कारवाईवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे या अहवालाबाबत बुधवारी कमालीची गुप्तता पाळण्यात आली.
ससूनच्या समितीतर्फे तयार करण्यात आलेल्या अहवालाची एक प्रत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे आयुक्त डॉ. राजीव निवतकर यांच्याकडे आणि अलंकार पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात आल्याचे ससून रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, अहवालातील कोणत्याही निष्कर्षाबाबत भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, ससूनच्या अहवालात रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आल्याचे भाष्य राजकीय नेत्यांकडून बुधवारी करण्यात आले.
डॉ. सुश्रुत घैसास यांनी बुधवारी अलंकार पोलिस ठाण्यामध्ये हजेरी लावल्याचे समजते. याबाबत विचारणा केली असता, दीनानाथ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांना नियमितपणे पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या वृत्ताला वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता रोकडे यांनी दुजोरा दिला नाही.
डॉ. घैसास यांना पोलिस संरक्षण
डॉ. सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची भाजपा महिला पदाधिकार्यांनी तोडफोड केली होती. त्या पार्श्वभूमीवर डॉ. घैसास यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगून पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती. त्यानुसार, पोलिसांनी दोन पोलिस अंमलदार डॉ. घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
पोलिस प्रशासनाने दीनानाथ रुग्णालय प्रकरणाची सर्व कागदपत्रे ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडे सुपूर्त केली होती. मंगळवारी (15 एप्रिल) रात्री उशिरापर्यंत समितीच्या सदस्यांची बैठक सुरू होती. समितीने अहवाल तयार केल्यावर बुधवारी सायंकाळी 5 वाजता अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव यांची डीन ऑफिसच्या अँटी चेंबरमध्ये तब्बल दोन तास प्रदीर्घ बैठक आणि चर्चा झाली. यादरम्यान, कोणालाही आत न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सायंकाळी 7.15 वाजता डॉ. जाधव यांनी अहवाल ‘बाय पोस्ट’ आणि ‘बाय हँड’ पाठवल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
एकीकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात एखादी फाइल, अहवाल काही सेकंदांमध्ये दुसरीकडे पोहचत असताना तंत्रज्ञानावरच अविश्वास दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अहवाल ई-मेलवरून पाठवला तर मेल हॅक होईल किंवा अहवाल लीक होईल, या भीतीने अहवाल ‘बाय पोस्ट’ किंवा ‘बाय हँड’ पाठवल्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याचे ससून प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अहवाल पोहचणार कधी, त्याबाबत कार्यवाही होणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने अहवाल तयार केला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे आणि अलंकार पोलिस ठाण्याकडे पाठवण्यात आला आहे. अहवाल गोपनीय असल्याने त्यातील निष्कर्षांबाबत कोणतेही भाष्य करता येणार नाही.डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय