पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातील ससूनचा अहवाल प्राप्त झाला आहे. ससूनच्या समितीने स्पष्टपणे नमूद केले आहे की, डॉ. सुश्रुत घैसास यांनी रुग्णावर उपचार करण्यास नकार दिल्यामुळे वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे. येत्या काही दिवसांत इतर हॉस्पिटल्सनाही नोटीस पाठवल्या जाणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
चाकरणकर म्हणाल्या, गेल्या आठवड्यापासून मी या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून, संबंधित दोषीवर कारवाई होईल. डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकणकर यांनी उशिरा रात्री भिसे कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, पुणे शहर पोलिसांनी डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर भा.दं.वि. कलम 106 (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास हा गुन्हा लागू होतो, परंतु तो सदोष मनुष्यवध म्हणून गणला जात नाही.
याबाबत बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पुणे शाखेने डॉ. घैसास यांना ठाम पाठिंबा दर्शविला आहे. पुणे आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे म्हणाले, आमचे सर्व सदस्य आणि आयएमएला ठाम विश्वास आहे की, डॉ. घैसास यांनी कोणताही वैद्यकीय निष्काळजीपणा केलेला नाही. त्यांनी रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला नव्हता किंवा चुकीचे उपचार केले नव्हते. आम्ही डॉ. घैसास यांना कायदेशीर मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ससूनच्या समितीने सुरुवातीला त्यांना क्लीन चिट दिली होती आणि आता अचानक पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ससूनच्या समितीवर राजकीय दबाव टाकून हा अहवाल बदलण्यात आला आहे, असे आम्हाला वाटत आहे.