exam  
पुणे

सारथी, बार्टी, महाज्योतीची प्रश्नपत्रिका ‘कॉपी-पेस्ट’

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांची संशोधन अधिछात्रवृत्ती (पीएचडी फेलोशीप) मिळविण्यासाठी राज्यात रविवारी झालेल्या पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका 2019 मध्ये 'सेट' परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची 'कॉपी' असल्याचे निदर्शनास आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (एमएच-सेट) विभागावर ही प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी होती. मात्र, त्यामध्ये 'कॉपी-पेस्ट' प्रकार झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे देण्यात येणार्‍या संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी पात्रता परीक्षा घेण्यात येते.

पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व नागपूर या विभागांतर्गत रविवारी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. 'सारथी'च्या 1 हजार 329, 'बार्टी'च्या 761 आणि 'महाज्योती'च्या 1 हजार 383 अशा एकूण 3 हजार 473 'पीएच.डी.' करणारे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मात्र, प्रश्नपत्रिका हाती पडताच ती 'सेट-2019'च्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे हुबेहूब असल्याचे आढळून आले. प्रश्नांचा क्रमही अगदीसारखा होता. या प्रश्नपत्रिका बंद पाकिटाऐवजी खुल्या पद्धतीने परीक्षा कक्षात आल्या होत्या. या सर्व प्रकारामुळे विद्यापीठाच्या 'सेट' विभागासह सारथी, बार्टी, महाज्योती संस्थांच्या परीक्षेच्या दर्जा आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारने परीक्षांवर पैसे खर्च करण्यापेक्षा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट 'फेलोशीप' द्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT