पुणे; पुढारी वृत्तसेवा : गायिका मनाली बोस यांची किराणा घराण्याच्या गायकीची बरसात….राहुल शर्मा यांच्या संतूरचे मधुर स्वर… श्रीनिवास जोशी यांच्या गायकीची सूरमयी अनुभूती अन् पं. अजय चक्रवर्ती यांच्या गायनाने केलेली सप्तसुरांची उधळण….असे सुरेल वातावरण सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात शुक्रवारी रसिकांना एका वेगळ्या स्वरप्रवासात घेऊन गेले. वडील दिवंगत ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे सुरेल प्रतिबिंब राहुल यांच्या वादनात झळकले अन् त्यांच्या संतूरच्या सुमधुर सुरांनी रसिकांच्या मनाच्या तारा छेडल्या. वडील गेल्यानंतर "सवाई" च्या व्यासपीठावरील त्यांचे पहिलेच सादरीकरण आणि त्याला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून दिलेल्या मानवंदनेने राहुल हे भावूक झाले.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिसर्या दिवसाची सुरवात दमदार झाली. कोलकातास्थित किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस यांनी राग मारवामध्ये एकतालात हळूवार सादरीकरणाने आपल्या गायनाची सुरवात केली. त्यानंतर "अब काहे सतावो जावो…" हा गारा व पिलू रागातील मिश्र दादरा व स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा लोकप्रिय भजन "बाजे रे मुरलिया बाजे" सादर केले. त्यांना अभिनय रवांदे (हार्मोनियम), पांडुरंग पवार (तबला), वीरेश संकाजे व वत्सल कपाळे (तानपुरा) यांनी अतिशय समर्पक साथ केली.
दुसर्या सत्रात पं. शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व संतूरवादक राहुल शर्मा यांचे सूरमयी संतूरवादन झाले अन् त्यांचे वादन रसिकांच्या मनाला भिडले. "सवाई"मध्ये कला सादर करताना कायम आनंद होतो. मी नेहमीच पुण्यातील श्रोत्यांसाठी वाजवतो,असे सांगत त्यांनी हंसध्वनी रागाने आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली. त्यामध्ये मत ताल, नऊ मात्रा,आलाप, जोड, झाला आणि दृत तीन ताल सादर केला. मिश्र खमाज धूनमध्ये दादरा आणि तीनताल सादरीकरणाने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना ओझस अढीया (तबला) यांनी अतिशय समर्पक साथ केली.
तिसर्या दिवसाच्या उत्तरार्धातील पहिल्या सत्रात स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि गायक श्रीनिवास जोशी यांचे गायन झाले. त्यांच्या गायनात किराणा घराण्याच्या गायकीची झलक रसिकांनी अनुभवली. माझे वडील आणि आई आज येथे उपस्थित आहेत आणि मी त्यांना गाऊन दाखवत आहे, असे वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी बिहाग रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यानंतर राग मिश्र खमाजमध्ये पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वर प्रदान गायकीचे वैशिष्ट्य खुलवणारी "सूर संग रंगरलिया…" ही स्वरचित बंदिश त्यांनी सादर केली.
संत कबीर रचना असलेल्या आणि जोशी यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या "गुरुविण कौन बतावे बाट" या भजनाने त्यांनी समारोप केला. त्यांना अविनाश दिघे ( हार्मोनियम), पं.रवींद्र यावगल ( तबला), वत्सल कपाळे व मुकुंद बादरायणी ( तानपुरा ), गंभीर महाजन (पखावज) आणि माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली. शेवटच्या सत्रात गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी े महोत्सवात सुरेल रंग भरले. त्यांनी राग बागेश्रीने गायनाला सुरुवात केली. सुरेल गायकी अन् त्याला साजेसे वादन यामुळे चक्रवर्ती यांची मैफिल उत्तरोत्तर रंगली. त्यानंतर चक्रबर्ती यांनी पहाडी राग सादर केला. अजय जोगळेकर (हार्मोनियम), ईशान घोष( तबला), मेहेर परळीकर आणि सौरभ काडगावकर यांनी साथसंगत केली.
हा महोत्सव भारतीय कलाकारांचे तीर्थक्षेत्र
मी संगीताचा मी छोटा दास आहे. पंडित भीमसेन जोशी हे मला नेहमी आशीर्वाद देत असत. 1988 मध्ये मला ते हात पकडून सवाईत घेऊन आले होते. आज माझे शिष्य तुमच्यासमोर त्यांची कला सादर करत आहेत, त्यांनाही तुम्ही प्रेम दिले आहे. विशेषतः कौशिकीसाठी मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो.
संगीताला तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. संगीत हे फक्त ऐकायचे नसते, प्रत्येक स्वर कसा दिसतो हे पाहायचे असते. गेल्या पंचवीस वर्षांपासून मी मुंबईत टू डेव्हलप इनर व्हिजन ऑफ राग म्युझिक या विषयावर संशोधन करतो आहे. महाराष्ट्रामुळे अभिजात शास्त्रीय संगीत जिवंत आहे. राज्याच्या कानाकोपर्यात हे संगीत ऐकले जाते, जाणकार आहेत. या महोत्सवात तरुणांची उपस्थिती जास्त असणे ही कौतुकाची बाब आहे, असे पं. अजय चक्रवर्ती यांनी सांगितलें
शास्त्रीय संगीत मनोरंजनासाठी नाही रात्री दहा वाजेपर्यंत गाण्याचा नियम शिथिल करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपल्या देशाचे नेतृत्व करणार्या नेत्यांशी मी या संदर्भात बोलणार आहे. शास्त्रीय संगीत हे शिक्षण आहे. हे संगीत करमणुकीचे नाही. भारतीय संगीत आणि आधुनिक तंत्रज्ञान याविषयावर मी सध्या आयआयटी खडकपूरमध्ये धडे देतो आहे. या संगीताचे महत्व आपण समजून घेतले पाहिजे. पं. भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा महोत्सव म्हणजे शास्त्रीय संगीताच्या कलाकारांचे तीर्थक्षेत्र आहे. पं. भीमसेन जोशी हे आजही आपल्यात आहेत. त्यांचे संगीत आपल्याबरोबर आहे.
– पंडित अजय चक्रवर्ती, गायक
महोत्सवात आज
यशस्वी पोतदा (गायन)
पं. उमाकांत गुंदेचा आणि अनंत गुंदेचा (धृपद)
भारती प्रताप (गायन)
विराज जोशी (गायन)
सिड श्रीराम (कर्नाटक संगीत – गायन)
उस्ताद राशिद खाँ (गायन)
आणि उस्ताद शाहीद परवेज (सतार) जुगलबंदी