वारकऱ्यांच्या जीवाला धोका
खाणधारक म्हणतात अधिकारी आमच्या खिशात
संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील प्रकार
यवत: दौंड तालुक्यातील वासुंदे येथील खाणमाफियांनी उच्छाद मांडला आहे. या खाणमाफीयांच्या सुरु असलेल्या खाणींचा फटका येथील अतिउच्चदाब विद्युत वाहिनी असलेल्या मनोरा व लाईनला संभावत आहे.
येथील वासुंदे जिरेगाव शिवेवरती असलेल्या एका स्टोन क्रशर खाणमाफीयाने प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात नियमबाह्य व बेकायदेशीर तसेच विद्युत मनोऱ्यालगत आणि विद्युत वाहिनीखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन केले आहे. तसेच येथील अन्य चार गटांत विद्युत वाहिनीखाली कित्येक एकर बेकायदेशीर उत्खनन झाले आहे, आणि राजरोस पणे सुरु आहे. हीच उच्चदाब विद्युत वाहिनी पुढे संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी महामार्गावरून गुंजखिळा येथे महामार्गावरून आरपार जाते. या खाणमाफीयांच्या भूसुरंगाच्या दणक्याने येतील विद्युत मनोऱ्याला यापूर्वी अपघात झाला होता. यातून या विद्युत वाहिनीला धोकाही निर्माण झाला होता. तातडीने यंत्रणा सतर्क झाल्याने पुढील अपघात आणि धोका टाळला आहे.
मात्र सध्या या खाणमाफीयांचे भूसुरंग दिवस रात्र सुरू आहेत. त्यामुळे या मनोऱ्याला त्याचा धोका मोठ्या प्रमाणात संभवत आहे. संत जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा याच मार्गावरून जात असताना या खाणींच्या काही अंतरावरच ही उच्च दाब विद्युत वाहिनी महामार्गावरून जाते. या खाणीमुळे येथील विद्युत वाहिनीस अपघात निर्माण झाल्यास हीच विद्युत वाहिनी संत जगद्गुरु तुकाराम महाराज महामार्गावरून असल्याने वारीकाळात वारकऱ्यांच्या जीवितास धोका संभवत आहे. त्यामुळे या दगड खाणींना तातडीने सील करण्याची गरज आहे.
कोणतीही उत्खनन परवानगी देताना सर्कल चौकशी आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी होते. मगच परवानगी दिली जाते. अशा आपत्कालीन आणि धोकादायक परिस्थिती निर्माण होईल अशा ठिकाणी खनिकर्म विभागाने परवानगी दिली कशी याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, तसेच खोटा चौकशी अहवाल सादर करुन माफियांना उत्खनन परवानगी मिळवून देणारे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची स्थानकांची मागणी आहे.
येथील माफीयांना कोणाच्या अभय आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र हे माफिया जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आमच्या खिशात आहेत असे सांगतात. त्यामुळे या वासुंदे जिरेगाव शिवेवरील विद्युत वाहिनीच्या खाली असलेल्या खाणीवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार? की वेळ मारुन नेणार हे पहाणे गरजेचे आहे...