Sant Tukaram Maharaj Palkhi Pudhari
पुणे

Sant Tukaram Maharaj Palkhi: पुणेकरांचा भावपूर्ण निरोप घेत तुकोबांची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ

‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुढील प्रवास सुरू; लोणी काळभोर येथे मुक्काम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यनगरीत दोन दिवसांचा मुक्काम आटोपून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी (दि. ११) सकाळी सातच्या सुमारास पंढरीच्या दिशेने पुढील प्रवासासाठी भक्‍मितय वातावरणात मार्गस्थ झाला. नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी असलेल्या तुकोबांच्या पालखीला पुणेकरांनी मनोभावे निरोप दिला. पालखी मार्गस्थ होताना अवघा परिसर ‌'ज्ञानबा-तुकाराम‌' आणि ‌'विठ्ठल विठ्ठल‌' या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

सकाळी मगरपट्टा चौकात जगदगाराजांच्या पालखीचे साडेअकरा वाजता आगमन झाले. या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी यावेळी एकच गर्दी केली होती. त्यांनतर पालखीचे हडपसर गाडीतळ येथे बारा वाजता आगमन झाले. यावेळी महापौर मंजूषा नागपुरे यांनी दर्शन घेऊन पालख्यांना निरोप दिला. यावेळी आमदार चेतन तुपे, आमदार योगेश टिळेकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त अरविंद माळी आदी या वेळी उपस्थित होते.

सकाळी पुण्यातून प्रस्थान झाल्यानंतर या सोहळ्याची पहिली विश्रांती भैरोबा नाला भागात झाली. त्यानंतर दुपारी हा सोहळा हडपसर भागात पोहोचला, येथे पालखीचा दुपारचा मुक्काम आणि विसावा झाला. दुपारच्या विसाव्यानंतर पालखीने पुन्हा पंढरीच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली. या प्रवासात पालखीची तिसरी विश्रांती मांजरी फार्म भागात झाली, तर चौथी विश्रांती लोणी काळभोर रेल्वे स्टेशन परिसरात झाली.

दिवसभराचा प्रवास करत संत तुकाराम महाराजांची पालखी रात्री लोणी काळभोर येथील कदम वाकवस्ती येथील नवीन पालखी तळावर विसावली. या ठिकाणी पालखीचा शनिवारचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. येथेही दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रविवारी (दि. १२) पालखी पुढील मुक्कामासाठी यवतच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

दरम्यान, पुण्यातील मुक्कामावेळी तुकोबांच्या दर्शनाचा आणि सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी अनेक पुणेकरांनी आपल्या कामधंद्याला आणि नोकरीला सुट्टी घेतली होती. गेल्या दोन दिवसांत शहरात ठिकठिकाणी अन्नदान, फराळ, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय मदत पुरवून पुणेकरांनी वारकऱ्यांची मनो भावे सेवा केली. शहरात दर्शन घेऊन न थांबता, अनेक पुणेकर नागरिक वारकऱ्यांसोबत थेट हडपसर, बोपदेव घाट आणि सासवडपर्यंत पायी चालत निघाले. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. शनिवारी सकाळच्या सुमारास संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT