Sant Tukaram Maharaj Palkhi Rath Pudhari
पुणे

Sant Tukaram Maharaj Palkhi Rath: देहूची वारी हायटेक! संत तुकाराम महाराजांसाठी ३०० किलो चांदीचा नवा पालखी रथ सज्ज

बर्मा टीक लाकडापासून तयार रथ अंतिम टप्प्यात; यंदाच्या आषाढी वारीत पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचाही संगम

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी अत्याधुनिक आणि आकर्षक असा नवीन पालखी रथ तयार करण्यात येत असून, या रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

पारंपरिकता आणि आधुनिकतेचा संगम साधणारा हा रथ यंदाच्या आषाढी वारीचे विशेष आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आषाढी पायीवारी सोहळा हायटेक रथातून संपन्न होणार आहे. हा रथ बर्माटिक लाकडापासून बनवण्यात आला असून, या लाकडावर दाक्षिण्य शैलीत कोरीव असे नक्षीकाम करण्यात आले आहे. त्याला तीनशे किलो चांदीचा मुलामा देण्यात येणार आहे. या रथाचे वजन पहिल्या रथापेक्षा सहाशे किलोने कमी असणार आहे.

रथाचे वजन चार टन

विशेष म्हणजे, नवीन रथामध्ये सुमारे दोन टन बर्मा टीक सागवानी लाकडाचा वापर करण्यात आला असून, रथाचे एकूण वजन सुमारे चार टन आहे. मात्र, जुन्या रथाच्या तुलनेत हा रथ सुमारे ६०० किलोने हलका असणार आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यादरम्यान बैलजोडींना रथ ओढणे अधिक सुलभ होणार असून, वारीदरम्यान सुरक्षितता व स्थिरताही वाढणार आहे. रथाच्या बांधकामात मजबुतीसह आधुनिक तांत्रिक बाबींचाही विचार करण्यात आल्याने तो अधिक टिकाऊ व दीर्घकाळ वापरण्यायोग्य ठरणार आहे.

७ जुलैला श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान

यंदा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३४१ वा आषाढी पायी वारी पालखी सोहळा ७ जुलै रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यापूर्वी नवीन पालखी रथाचे सर्व काम पूर्ण करून तो सेवेसाठी सज्ज करण्यात येणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त दिलीपमहाराज मोरे, वैभवमहाराज मोरे तसेच पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे यांनी दिली.

रथासाठी कर्नाटकातील लाकडांचा वापर

नवीन पालखी रथाच्या निर्मितीसाठी कर्नाटक राज्यातील दांडोली परिसरातून आणलेल्या उच्च दर्जाच्या बर्मा टीक (सागवान) लाकडांचा वापर करण्यात आला आहे. रथ निर्मितीसाठी सुमारे १५० घनफूट लाकूड वापरण्यात आले असून, त्यावर अत्यंत सुबक व कलात्मक कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. हे कोरीव काम राजस्थान राज्यातील सिरोही गावात कोंढवा येथील स्वामी आर्टचे सुरेश मिस्त्री यांनी कुशल कारागिरांकडून करून घेतले असून, त्यासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे.

रथ होणार अधिक देखणा

रथावरील नक्षीकाम दक्षिणात्य स्थापत्यशैलीवर आधारित असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक प्रतिकृतींमुळे रथ अधिक देखणा आणि भव्य बनत आहे. याशिवाय, रथावरील लाकडी कोरीव कामावर सुमारे ३०० किलो चांदीचा मुलामा व सजावटीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे रथाचे सौंदर्य अधिक खुलून येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT