पुणे

भवानीनगरमध्ये पालखी मार्गाचे काम वेगात

अमृता चौगुले

भवानीनगर, पुढारी वृत्तसेवा: जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम भवानीनगरमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. श्री छत्रपती कारखान्याचा गाळप हंगाम येथे दीड महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी पालखी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे.

श्री छत्रपती कारखान्यासमोर जुन्या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला पोकलेन मशिनच्या साह्याने खोदाई करण्याचे काम सुरू आहे. कारखान्यासमोरील खोदाईचे काम निम्मे पूर्ण झाले आहे. कारखान्यासमोरील एका बाजूस रस्त्यासाठी खोदाई करून त्यामध्ये मुरूम भरण्यात आला आहे. दुसर्‍या बाजूमध्ये मुरूम भरण्याचे काम सुरू आहे. कारखाना परिसरात जुन्या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला पालखी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे काढण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी पालखी मार्गाच्या कामात जुन्या बांधकामाचा अडथळा निर्माण होत आहे ती बांधकामे काढून टाकण्यात येत आहेत.

कारखान्याचा गाळप हंगाम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असून कारखान्याच्या गाळप हंगामामध्ये उसाच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यासमोरील पालखी मार्गाचे रुंदीकरणाचे काम पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी उड्डाण पुलाचे नियोजन असून लवकरच उड्डाण पुलाचे कामदेखील सुरू होणार आहे. कारखान्याच्या पोलिस दूरक्षेत्राच्या समोरील रस्ता, एसटी स्टँडजवळचा रस्ता व कारखान्याच्या ट्रॅक्टर गटाजवळील रस्ता या तिन्ही रस्त्यांसाठी उड्डाण पुलाच्या ठिकाणी अंडरपास ठेवण्यात यावेत, अशी मागणी सणसर ग्रामपंचायतीचे सरपंच रणजित निंबाळकर यांनी बारामतीचे प्रांत अधिकारी यांच्याकडे केली आहे.

SCROLL FOR NEXT