पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-965) कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सुरवडी (ता. फलटण) येथे पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी जेजुरीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 250 कोटींचा उड्डाणपूल आणि फलटण शहराच्या कायापालटासाठी 97 कोटींच्या विशेष प्रकल्पाची घोषणा करत वारकरी आणि भाविकांसाठी सुखद धक्क्यांची शिदोरी उघडली.
पालखीमार्गाच्या सहा पॅकेजेसचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गाची पाहणी करताना गडकरींनी फक्त रस्त्यांचा आढावा घेतला नाही, तर स्थानिक नागरिक आणि वारकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली.
यामध्ये प्रामुख्याने जेजुरी गड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, तिथे 2 कि.मी. लांबीचा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या पुलामुळे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतूक अधिक वेगवान होणार आहे.