आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी वारी पालखी सोहळा १९ जुन रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. ५ जुलै रोजी माऊलींची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. पंढरपूर येथे पार पडलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज बैठकीत वारीतील विसावा, मुक्काम व इतर नियोजनावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. अद्याप अधिकृत वेळापत्रक ठरले नसून लवकरच संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे देवस्थान तर्फे सांगण्यात आले आहे. यंदा पालखी सोहळा वेळापत्रक तिथीक्षय होत असल्याने लोणंद येथे अडीच दिवस मुक्काम घ्यावा अशी चर्चा दिंडी सामाजिक बैठकीत झाली. मात्र, यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ऍड.राजेंद्र उमाप, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, नामदेव वासकर, विठ्ठल वासकर, मारुती कोकाटे, भाऊ महाराज फुरसुंगीकर, चैतन्य महाराज कबीर, आबा धाडगे, एकनाथ हांडे आदी उपस्थित होते.
पालखी प्रस्थान सोहळा १९ जून रोजी अलंकापुरीमध्ये पार पडणार आहे. आळंदी आजोळ घर गांधी वाड्यातून पालखी २० जून रोजी पंढरपुरकडे मार्गस्थ होईल. ५ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूर मध्ये पोहचेल. ६ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी सोहळा पंढरपुर मध्ये पार पडणार आहे.
एक तिथी तिथीक्षय होत असल्याने काही ठिकाणी मुक्काम वाढत असून एका ठिकाणचा मुक्काम रद्द करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गेल्या चार वर्षात काही नवीन विसावे ठरले होते ते देखील यंदाच्या सोहळ्यात बदलण्यात येण्याची शक्यता आहे. त्यावर समाज बैठकीत एकमत न झाल्याने अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसल्याचे समजते.