आळंदी : चला हो पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू।
भीवरे स्नान करुनीया, संत-पद-धूळ शिरि लावू ॥
बोधरुप तुळशिच्या माळी, श्रवण-मणि चंदनहि भाळी ।
करू मननाचिया चिपळी, निजध्यासे हरि गाऊ ॥
वरुणराजाच्या सरी झेलत ’ज्ञानोबा-माउली’चा जयघोष आणि टाळ-मृदंगांच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने गुरुवारी (दि.१९) रात्री पावणेअकराच्या सुमारास देऊळवाड्यातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. प्रस्थान सोहळ्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाची हजेरी होती. सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात देखील पावसाने हजेरी लावली. यावेळी अवघी अलंकापुरी ’माउली माउली’च्या गजराने दुमदुमून गेली होती. शुक्रवारी (दि.२०) पहाटे माउलींची पालखी पुण्याच्या दिशेने प्रयाण करणार आहे.
माइलींच्या समाधी मंदिरात पहाटे चार वाजता घंटा नादाने या वैभवी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर काकड आरती झाली. पहाटे सव्वाचार ते साडेपाच या वेळात माउलींना पवमान अभिषेक, पंचामृतपूजा व दुधारतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सकाळी नऊ वाजता माउलींच्या समाधीच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दुपारी १२ च्या सुमारास माउलींना महानैवेद्य दाखविण्यासाठी दर्शनबारी बंद करण्यात आली. त्यानंतर गाभारा स्वच्छ करून समाधीस पाणी घालण्यात आले. दुपारी साडेबारा ते पाच या कालावधीत पुन्हा भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. सायंकाळी सात ते आठच्या सुमारास गुरुवारची माउलींची पालखी मिरवणूक पार पडली. रात्री आठ वाजता प्रस्थानच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली.
मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून आत सोडण्यास सुरुवात करण्यात आली. मानाच्या ४७ दिंड्या देऊळवाडा परिसरात दाखल झाल्यानंतर ’ज्ञानोबा-माउली’च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगांच्या गजराने अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. पांढरे शुभ्र बंडी-धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी, हातात टाळ, पताका घेऊन असलेला वारकरी आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी यांचे लयबद्ध संचलन, देऊळवाड्यात या वारकऱ्यांनी उभारलेले मनोरे, महिलांच्या फुगड्या आणि फेर आणि टिपेला पोहचलेल्या टाळ-मृदंगांच्या गजरात देहभान हरपून नाचणारे टाळकरी, यामुळे हा सोहळा अधिकच रंगला.
रात्री ९ वाजता ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या मानाच्या अश्वाचा देऊळवाड्यात प्रवेश झाला. रात्री साडेनऊ वाजता माउलींची आरती पार पडली. त्यानंतर मानकर्यांना नारळप्रसाद वाटप करण्यात आला. रात्री पावणेअकराच्या सुमारास माउलींच्या पालखीने वीणा मंडपातून प्रस्थान ठेवले. यावेळी अवघा देऊळवाडा ’माउली-माउली’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. मंदिरप्रदक्षिणा घालून पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. नगरप्रदक्षिणा घालून नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ, मूळपीठ येथे आरती होऊन रात्री उशिरा माउलींची पालखी गांधीवाडा, दर्शनबारी मंडपात विसावली. शुक्रवारी पहाटे पालखी आळंदीवरून पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
या सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गजानन पाटील, खासदार संजय जाधव, आमदार रोहित पवार, महेश लांडगे, बाबाजी काळे, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, अॅड. रोहिणी पवार, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पंढरपूर देवस्थान अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, विश्वस्त माधवी निगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.