Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Pudhari
पुणे

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat: ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात माऊलींची पालखी दिवेघाटाकडे; मार्गभर भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हडपसर, भेकराईनगर, उरुळी देवाची, वडकी येथे भक्तिमय स्वागत; दिवेघाट चढताना लाखो वारकऱ्यांचा उत्साह

पुढारी वृत्तसेवा

फुरसुंगी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शनिवारी सकाळी पुण्यातून प्रस्थान करून हडपसर, भेकराईनगर, उरुळी देवाची आणि वडकी मार्गे दिवेघाटाकडे रवाना झाली. 'ज्ञानबा-तुकाराम'च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. मार्गावरील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. मात्र पालखी मार्गाच्या रुंदीकरणाची कामे सुरू असल्याने सोहळ्याला काहीसा विलंब झाला.

हडपसरनंतर भेकराईनगर येथे फुरसुंगी ग्रामस्थांनी माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत केले. या वेळी हजारो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेत विठूनामाचा गजर केला. दुपारी सुमारे दीडच्या सुमारास पालखी उरुळी देवाची फाट्यावर दाखल झाली. उरुळी देवाची पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

पुणे ते सासवड हा पालखी सोहळ्यातील सर्वात मोठा टप्पा असून उरुळी देवाची येथे विसावा असतो. पोलिस चौकीसमोरील विसावा ओट्यावर पादुका ठेवण्यात आल्यानंतर उरुळी देवाची, शेवाळेवाडी, होळकरवाडी, औताडेवाडी, हांडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी परिसरातील भाविकांनी पादुकांवर माथा टेकून दर्शन घेतले.

विसाव्यादरम्यान अनेक वारकऱ्यांनी न्याहारीचा आस्वाद घेतला. त्यानंतर पालखी वडकीकडे रवाना झाली. दहावा मैल व वडकीनाला परिसरातही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्या गायकवाड, गटविकास अधिकारी शेखर शेलार व गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे यांनी पालखीचे स्वागत केले.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मानाच्या सहा बैलजोडीसह माऊलींच्या पालखी रथाने दिवेघाट चढण्यास सुरुवात केली. पालखी मार्गावर विविध सामाजिक संस्था, मंडळे व प्रशासनाच्या वतीने अल्पोपहार, पिण्याचे पाणी व वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT