पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सांगवी परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिकेची विक्री करून एका डॉक्टरची 27 लाख 50 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑक्टोबर 2016 ते 16 ऑगस्ट 2023 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.
डॉ. सुरेश डोंगरसिंग नाईक (43, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरण शंकर गारवे, किशोर शंकर गारवे (दोघे रा. पिंपळे गुरव), यशवंत माधवराव बारहाते (रा. अहमदनगर) आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी महापालिकेच्या बनावट शिक्क्यांचा वापर करून बांधकाम सुरू करण्यासाठी बनावट दाखला तयार केला. त्या आधारे व्यावसायिक इमारत बांधली. पहिल्या मजल्यावर तीन दुकाने करून सदनिका बांधल्याचे कागदोपत्री दाखवले. दरम्यान, सन 2005 मध्ये ती सदनिका यशवंत बारहाते यांना विकली. त्यानंतर आरोपींनी सन 2016 मध्ये फिर्यादीकडून 27 लाख 50 हजार घेऊन सदनिकेची विक्री केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.