पुणे

पुणे : संगमनेर शाळेतील अल्पवयीन मुली असुरक्षित

अमृता चौगुले

भोर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर (ता. भोर) मधील अल्पवयीन मुली शिक्षणासाठी एक किलोमीटर अंतरावर नर्‍हे कॉलनी येथे पायवाटेने जातात. ही पायवाट लोकवस्तीपासून शाळेपर्यंत निर्मनुष्य आहे. वाटेत छेडछाड, विनयभंग याबाबत इतरत्र कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याचीही धमकीही त्यांना दिली जात असल्याने या मुलींच्या सुरक्षेची चिंता पालकांना लागली आहे. संगमनेर गावातील अल्पवयीन मुली माध्यमिक शिक्षणासाठी नर्‍हे कॉलनी येथे न्यू इंग्लिश स्कूलला जातात. लोकवस्तीपासून या शाळेचे अंतर एक किलोमीटर आहे. शाळेत जाण्यासाठी निर्मनुष्य पायवाटेचा उपयोग केला जातो. पायवाटेवरील 200 मीटर अंतराचा भाग खोलगट स्वरूपाचे आहे. या खोलगट भागात काही तरुण शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटताना मुलींची प्रतीक्षा करीत असतात. परिणामी, मुलींच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. छेडछाड, विनयभंग असे प्रकार होत असल्याने मुलींमध्ये नाराजी आहे. परिणामी, मुलींच्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे.

परिसरातील अवैध दारूधंदे बंद करा
मुलींचे पालक दररोज रोजंदारी व उद्योग-व्यवसायासाठी दिवसभर परिसरात जात असतात? परंतु शाळेच्या पायवाटेवर असे प्रकार होत असल्याने आपले पाल्य शाळेतून घरी सुरक्षित येतील का नाही याची शाश्वती नसल्याने पालकवर्गाचा जीव टांगणीला लागला आहे. नर्‍हे कॉलनी येथे 3 अवैद्य हातभट्टीचे दारूधंदे वर्षानुवर्ष सुरू आहेत. संगमनेर गावातील काही मद्यपी दारू पिण्यासाठी याच पायवाटेने ये-जा करीत असतात. मद्यपींमुळेही मुलींच्या मनात भीती निर्माण होत आहे. पोलिस प्रशासनाने दारूधंदे कायमस्वरूपी बंद करावेत, अशी मागणी पालकवर्गासह नागरिक करीत आहेत.

पर्यायी रस्त्याचे डांबरीकरण करा
संगमनेर लोकवस्तीपासून शाळेपर्यंतची पायवाट मुलींसाठी धोकादायक झाली आहे. रस्त्याला सुरक्षित पर्याय रस्ता संगमनेर लोकवस्ती ते नर्‍हे गावची शिव हा पाणंद रस्ता आहे. मुलींबाबत एखादी वाईट घटना घडण्यापूर्वी लवकरात लवकर संबंधित पाणंद रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे.

SCROLL FOR NEXT