Maharashtra Assembly Polls Pudhari News
पुणे

Maharashtra Assembly Polls: शिवसेना (उबाठा) सोबतची युती तुटली; संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार

Sambhaji Brigade News: राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pune Politics: राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने संभाजी ब्रिगेड संघटनेला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही युती आता तुटली असून राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार आहे. राज्यात 50 पेक्षा अधिक उमेदवार देणार असल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते डॉ गंगाधर बनबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, संघटक संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते उपस्थित होते. आखरे म्हणाले, संभाजी ब्रिगेड गेल्या ३५ वर्षांपासून शिव-फुले-शाहू-आंबेडकर हि विचारधारा घेऊन कार्यरत आहे.

दोन वर्षांपूर्वी शिवसेना (उबाठा) यांच्या बरोबर संभाजी ब्रिगेडची युती झालेली होती. लोकसभा निवणुकीत एकही जागा न घेता संभाजी ब्रिगेडने शिवसेना (उबाठा) व मविआचा प्रचार केला. महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला संभाजी ब्रिगेडला त्यांच्या कोट्यातून किमान ४ ते ५ जागा देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु विधानसभेच्या जागा वाटपात आम्हाला सन्मानपूर्वक स्थान व आधासनानुसार जागा दिल्या नसल्याचा आरोप आखरे यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना (उवाडा) बरोबरची युती तोडून महाविकात आघाडीतून आम्ही बाहेर पडत आहोत. जात धर्म व फॅसिस्ट शक्तींना ब्रिगेडचा नेहमीच विरोध राहिला असून तो कायम राहील. संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही लोकांचे प्रश्न व महामानवाचे विचार घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत.

सुमारे ५० जागेवर आमचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. महायुतीची सनातन विषमता व आघाडीचे नकली पुरोगामीत्व याविरोधात समाजमत तयार करण्याची गरज असल्याचे ही डॉ बनबरे यांनी यावेळी सांगितले.

मनोज जरांगे यांना संभाजी ब्रिगेडचे शिष्टमंडळ भेटणार

संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणाबाबत ची भूमिका यापूर्वी जाहीर केली आहे. मनोज जरांगे आणि संभाजी ब्रिगेड यांची मराठा आरक्षणाबाबत एकसारखी भूमिका आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येऊन निवडणूक लढवू शकते. त्यावर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेड चे एक शिष्टमंडळ लवकरच भेट घेऊन एकत्र निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT