Samadhan Koli was transferred from traffic branch to Khadki police station ten days ago.
बोपोडीतील हिट अँड रन प्रकरण File Photo
पुणे

Hit and run case| पोलिसांना उडवून कारचालक घरी झोपला

पुढारी वृत्तसेवा

बोपोडी परिसरातील हिट अँड रनच्या घटनेतील मोटारचालक पोलिसांना उडविल्यानंतर पोलिस आपल्यापर्यंत पोहचू नयेत, या उद्देशाने गाडी अन्य ठिकाणी लावून घरी झोपण्यास गेला होता. पण, अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान कोळी यांची वाहतूक शाखेतून खडकी पोलिस ठाण्यात दहा दिवसांपूर्वीच बदली झाली होती.

रविवारी रात्री त्यांची बीट मार्शल म्हणून ड्युटी होती. त्यांच्यासोबत पोलिस शिपाई संजोग शिंदे यांना ड्युटी देण्यात आली होती. संजोग शिंदे हे दुचाकी चालवत होते, तर समाधान कोळी हे मागे बसले होते, त्यांनी रात्री दीडच्या सुमारास बोपोडीतील एका पॉइंटला भेट दिली. तेथे नेहमीप्रमाणे पोलिसांच्या अॅपवर दोघांनी भेट दिल्याचा सेल्फी टाकला.

यानंतर ते पुढील पॉइंटवर भेट देण्यासाठी निघाले आणि अवघ्या दहा मिनिटांतच त्यांच्या दुचाकीला अंडरपासजवळ मागून भरधाव वेगात आलेल्या स्वीफ्ट कारने उडविले. यामध्ये मागे बसलेले समाधान कोळी हे कारच्या बोनेटवर उडाले, तर संजोग शिंदे हे रस्त्याच्या कडेला दुचाकीसह पडले.

कारचालकाने समाधान यांना काही अंतर फरफटत नेले. यानंतर ते खाली पडून कारच्या चाकाखाली सापडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. यानंतर कारचालकाने न थांबता तशीच कार पुढे दामटत नेत पळ काढला, दोघेही कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती एका बाहनचालकाने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. यानंतर दहा मिनिटांतच मरिआई गेट पोलिस चौकीतील बीट मार्शल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांनाही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात दाखल केले.

तेथे समाधान कोळी यांना मृत घोषित करण्यात आले, तर गंभीर जखमी संजोग शिंदे यांना रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून अपघात करून पळ काढलेल्या कारचा शोध घेतला. कारचालकाने कार घरापासून लांब लावल्याचे आढळून आले.

अपघातानंतर कारचालक घरी जाऊन झोपला होता. कार लांब लावल्याने पोलिस आपल्या घरापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, असे त्याला वाटले होते. मात्र, सिद्धार्थ केंगारला पोलिसांनी ताव्यात घेतल्यावर चौकशी केली असता, तो फुगेवाडीतील साई सर्व्हिस सेंटरमध्ये कामाला असल्याचे समजले.

त्याच्या रॉबीन नावाच्या मित्राने रात्री कार आणली होती. या कारमधून रपेट मारण्यासाठी तो बोपोडीतून बाहेर पडला. तेथून पुन्हा तो भरधाव वेगात घरी येत असताना त्याने दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना उडवले.

पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून माहिती काढली असता, ती मुकेश अटवाल (रा. औंध) नावाच्या व्यक्तीची असल्याचे समजले. यामुळे पोलिस आता गाडीमालक आणि आरोपीचा मित्र रॉबिनचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. पोलिस आयुक्तांकडून सांत्वन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट दिली, तसेच रुग्णालयातही त्यांनी भेट दिली. पोलिस आयुक्तांनी कोळी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. समाधान कोळी यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

SCROLL FOR NEXT