पुणे : घरातील चूल आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळता सांभाळता एखादी गृहिणी आपल्या सुरांनी महाराष्ट्राला वेड लावेल, अशी कोणालाही कल्पना नव्हती. मात्र, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील घोणशेत येथील ४८ वर्षीय सखुबाई लंके यांनी हे सत्यात उतरवून दाखवले आहे. कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय केवळ नैसर्गिक गोड गळ्याच्या जोरावर सखुबाई सध्या सोशल मीडियावर स्टार ठरल्या आहेत. सध्या त्यांचा 'दिल दिवाना' या गाण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सखुबाई यांचे लग्न वयाच्या १६ व्या वर्षी झाले. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी समर्पित केले. मात्र, कामाच्या गडबडीत गाणी गुणगुणण्याचा त्यांचा छंद कधीच सुटला नाही. लता मंगेशकर यांची गाणी त्यांना मनापासून आवडतात. अनेक वर्षांपासून त्यांच्या सुरांचा प्रवास केवळ घराच्या भिंतींपुरताच मर्यादित होता, पण त्यांच्या मुलाने ही कला जगासमोर आणण्याचे ठरवले.
त्यांचा मुलगा अजय याने आईचा गातानाचा एक साधा व्हिडिओ रेकॉर्ड केला. कोणताही स्टुडिओ नाही, कोणतेही एडिटिंग नाही की मेकअप नाही; घरच्या साध्या वातावरणात गायलेले ते गाणे अजयने इंस्टाग्रामवर अपलोड केले. सखुबाईंचा साधेपणा आणि त्यांच्या आवाजातील आर्तता थेट नेटकऱ्यांच्या हृदयाला भिडली. पाहता पाहता या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळू लागले.
सखुबाई जुनी हिंदी गाणी ज्या आत्मविश्वासाने गातात, ते पाहून अनेक दिग्गज कलाकारही थक्क होत आहेत. त्यांनी नुकतेच १९८९ साली आलेल्या सलमान खानच्या 'मैने प्यार किया' या सुपरहिट हिंदी चित्रपटातील 'दिल दीवाना' हे गाणे गायले आहे. या गाण्याचा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे.