पुणे

पुणे : ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सहकारनगर पोलिस खडबडून जागे 

Arun Patil

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना पहायला मिळत आहे. स्थानिक गुंड राजरोसपणे हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. असाच एक प्रकार बालाजीनगर येथे घडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर येथे फुकट भाजी दिली नाही म्हणून गुंडांनी संबंधित तरुणाला मारहाण करत पाया पडायला लावले. तसेच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर सहकारनगर पोलिस खडबडून जागे झाले असून खातर जमा करून संबंधितांवर आता सुमोटो (स्वतःहून) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांनी सांगितले, 1 जानेवारी रोजी संभाजीनगर परिसरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये पालघन, कोयता घेऊन दहशत माजविणार्‍या व वाहनांची तोडफोड करणार्‍या 10 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी गाड्या अडवून मारहाण केल्याबाबतचा व्हायरल झालेला व्हिडीओ बालाजीनगर येथील असून यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे.

तर ज्या व्हिडीओमध्ये एका मुलाला जबरदस्तीने पाय धरून माफी मागायला लावली जात असता तो व्हिडीओ बालाजीनगर येथील गुलमोहर अपार्टमेंट येथील आहे. तसेच तो व्हिडीओ मार्च 2021 पुर्वीचा असल्याचे पोलिसांचे म्हणने असून त्या आरोपीवर दरोड्याचा गुन्हा दाखल असून तो कारागृहात आहे. दरम्यान ज्या व्हिडीओमध्ये लहान मुलास मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे. त्याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेतले असून पाच जणांचा शोध पोलिस घेत आहे.

एका टिकटॉकच्या व्हिडीओमध्ये तीन जण हत्यार घेऊन जिण्यावरून खाली उतरत असल्याचे दिसत आहेत. त्या गुन्ह्यात एकाला ताब्यात घेण्यात आले असून दोन जणांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. समाज माध्यमावर व्हायरल होत असलेले यातील काही व्हिडीओ जुने असून यापूर्वीच त्या अनुषंगाने संबंधीत संशयीत आरेापींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे सहकारनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई देसाई यांनी सांगितले.

शहरात एकीकडे मोक्का, एमपीडीए, तडीपारीने गुंडाच्या बेकायदेशिर हालचालीला लगाम घालण्यात पुणे पोलिसांना यश आल्याबाबत बोलले जाते. परंतु, काही घटनांमध्ये स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अशा गुंडांचे फावते ? त्यातून सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. स्थानिक पोलिसांचा गुन्हेगारांवर व गुन्हे करणांवर वचक नाही का ? याबाबत सामान्या नागरिकांना जे दिसते ते पोलिसांना का दिसत नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात होता.

व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या गुन्ह्यात नऊहून अधिक जणांवर गुन्हा दाखल

पहिल्या गुन्ह्यात सल्या उर्फ सलमान, आदेश बिरामाणे, सुफीयान, आफान शेख, सौरभ भगत, सॅन्डी आणि त्याचे चार साथीदार तर दुसर्‍या गुन्ह्यात सलमान हमीद शेख (23, रा. इलासा अर्पामेेट, बालाजीनगर, धनकवडी), योगेश युवराज भांगे (23, रा. चैत्रबन वसाहत, अप्पर बिबवेवाडी) आणि पवन विकास ओवाळ (21, रा. चैत्रबन सोसायटी, अप्पर बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT