एस. टी. महामंडळ  ST File Photo
पुणे

एस. टी. बसगाड्या बंद असल्याने धोकादायक प्रवास

महाविद्यालयात ये -जा करण्यासाठी धोकादायक प्रवास

पुढारी वृत्तसेवा

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना जाणार्‍या मंगरूळ पारगाव, भागडी, नागापूर या एस. टी. बसगाड्या बंद असल्याने प्रवासी, शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात सुरू असलेले हाल कायम आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ये -जा करण्यासाठी धोकादायक प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थिनींचे मोठे हाल सुरू आहेत.

तालुक्याच्या पूर्व भागात चांडोली, थोरांदळे, रांजणी, वळती, नागापूर या गावांना जाणार्‍या अनेक एस.टी. बसगाड्या अनेक दिवसांपासून बंद केल्या आहेत. सकाळी 7 वाजता शिंगवे, त्यानंतर 9 वाजता पिंपरखेड या दोनच एस.टी. बसगाड्या सध्या सुरू आहेत, त्यानंतर दिवसभर एकही एस.टी. बसगाडी सुरू नाही. 11 वाजल्यानंतर सायंकाळी 7 वाजेपर्यंत बसस्थानकात ताटकळत बसावे लागत आहे. एस.टी. बस सेवा बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . विशेषकरून महाविद्यालयात शिकणार्‍या मुलींचे सध्या हाल सुरू आहेत. महाविद्यालयात ये - जा करताना त्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

भागडी, नागापूर या एस.टी. बसगाड्या सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनेकदा मंचर आगारात निवेदने दिली, परंतु त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. संबंधित गावोगावच्या ग्रामपंचायतींनी मंचर आगाराशी पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे, परंतु ग्रामपंचायतींकडून याबाबत पत्रव्यवहार होत नाही. या भागातील नेतेमंडळींनी याबाबत पुढाकार घेतला तर एस. टी. बसगाड्या सुरू होतील, परंतु कोणीही त्याविषयी बोलत नाही

विद्यार्थिनींची कुचंबना

रांजणी, वळती नागापूर परिसरातील अनेक विद्यार्थी मंचर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतात. मुले कोणत्याही वाहनाने प्रवास करतात. परंतु मुलींचे मात्र सध्या हाल सुरू आहेत. अनोळखी व्यक्तींच्या दुचाकीवरून मुलींना प्रवास करावा लागतो, परंतु शाळेत वेळेत जाण्यासाठी मुली एकमेकींचा आधार घेतात. त्या दुचाकी, ट्रिपल सीटने प्रवास करतात. यामध्ये मुलींची कुचंबना होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT