नानगाव; पुढारी वृत्तसेवा : दौंंड तालुक्यातील भीमा नदीपट्ट्यातील बागायती भागात सध्या विविध वन्य प्राणी दिसून येत आहेत. बिबटे, लांडगे, कोल्हे व इतर वेगवेगळे वन्य प्राणी सध्या लोकवस्तीत दिसून येत आहेत. वाढती सिमेंटची जंगले व जंगलतोड यामुळे हे होत असून, पाळीव प्राण्यांवरील हल्ले भीतीदायक ठरत आहेत.
जंगल भागात तसेच शहरांच्या आजूबाजूला वाढणारी सिमेंटची जंगले यामुळे वन्य प्राण्यांचा हक्काचा निवारा दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच माणसाचा निसर्गात वाढता हस्तक्षेपही या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे. हक्काचा निवारा कमी होत असेल तर असे वन्य प्राणी नक्कीच ग्रामीण भागातील लोकवस्ती व शेतीचा आडोसा घेणार. परिणामी भविष्यात या भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढणार असून संख्याही वाढणार आहे.
ज्या भागात चांगला निवारा, अन्नपाणी आणि सुरक्षित वातावरण असेल अशा भागात असे वन्य प्राणी आपले वस्तव्य करतात. दौंड तालुक्यातील भीमानदीपट्ट्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती आहे. पाणी आणि सुरक्षित निवारा आहे, त्यामुळे गट्ल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्यांचा मोठा वावर वाढला आहे. जिथे बिबट्यांचा अधिवास आहे तो भाग इतर वन्य प्राण्यांसाठीही सुरक्षित आहे. त्यामुळे या भागात काही महिन्यांपासून वन्य प्राणी आढळून येत आहेत. अशा प्राण्यांचा दिवसेंदिवस अधिवास वाढत गेल्यास एक दिवस सर्व वन्य प्राण्यांची संख्या वाढणार असून, वनविभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.