वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक कुणबी नोंदी सापडलेल्या वेल्हे तालुक्यात आता कुणबी जात दाखल्यांसाठी नागरिकांची झुंबड सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनानंतर गेल्या महिनाभरात 500 जणांनी कुणबी जात दाखल्यांसाठी अर्ज दाखल केले आहेत, तर आतापर्यंत 100 जणांना कुणबी दाखले देण्यात आले आहेत. तर वेल्हे तहसील कार्यालयाच्या वतीने 34 गावांतील जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये सापडलेल्या मोडी लिपीतील नोंदी मराठीत प्रकाशित केल्या आहेत.
कुणबी नोंद शोधमोहिमेत वेल्हे तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. तहसीलदार दिनेश पारगे यांच्या देखरेखीखाली तहसील कार्यालयातील विशेष कुणबी नोंद कक्षात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 46 हजार 416 दस्तऐवजांत तब्बल 9 हजार 355 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. यातील बहुतांश नोंदी गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये सापडल्या आहेत. याशिवाय बि—टिश राजवटीतील जनगणना, गॅझेट, भूमि अभिलेख विभागातील दस्तऐवज, शिवकालीन सनद, वतन तसेच शिक्षण व विविध विभागांतील दप्तरांची तपासणी सुरू आहे.
पटकी, तापाने मोठ्या प्रमाणात मृत्यू
पानशेत, वरसगाव धरण खोर्यासह राजगड, तोरणा, वेल्हे भागातील गावोगावच्या बि—टिश राजवटीपासूनच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये बहुतेक मराठ्यांचा उल्लेख कुणबी जात म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत सरसकट असल्याचे पुढे आले आहे. पानशेत धरण खोर्यातील गावात पटकी, ताप, हिवताप अशा कारणांमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे दिसून येते. असेच चित्र राजगड, तोरणा भागातील अतिदुर्गम गावांत आहे.
तालुक्यातील सर्व 129 गावांच्या जन्म-मृत्यू रजिस्टरची तपासणी पूर्ण झाली आहे. सर्वात अधिक कुणबी नोंदी जन्म-मृत्यू रजिस्टरमध्येच सापडल्या आहेत. त्यामुळे सर्व गावांचे जन्म-मृत्यू रजिस्टर मराठी भाषेत प्रकाशित करण्यात येणार आहेत. आतापर्यंत 34 गावांच्या नोंदी मराठीत प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
– दिनेश पारगे, तहसीलदार, वेल्हेवेल्हे तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात कुणबी जात दाखल्यांसाठी विद्यार्थी, युवक, महिलांसह नागरिकांची दररोज गर्दी होत आहे. कुणबी जात दाखल्यांसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेले 20 ते 25 अर्ज दररोज दाखल होत आहेत. मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्यापासून महिनाभरात 500 अर्ज दाखल झाले आहेत. जवळपास 100 जणांना दाखले मिळाले आहेत.
– दिगंबर कोकाटे, संचालक, नागरी सुविधा केंद्र