टाकळी भीमा: घरगुती गॅससिलिंडरची सातत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिक महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. गॅससिलिंडरचे वाढलेले दर सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना घरातील सिलिंडर जास्त दिवस चालावा म्हणून शेतावर, माळरानावर फिरून जळणासाठी सरपण गोळा करण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे.
घरगुती गॅससिलिंडरची किंमत 811 रुपयांवर पोहचली असून, त्यामध्ये अतिरिक्त गाडीभाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे सिलिंडरचा खर्च एक हजारावर पोहचला आहे. अशा स्थितीत गॅससिलिंडर घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक पुन्हा चुलीचा आधार घेत आहेत. सरपण गोळा करण्यासाठी गावातील महिला वणवण शेतामध्ये भटकंती करताना तालुक्यातील गावागावांत दिसत आहेत.
उज्ज्वला योजनेतून गरीब कुटुंबांना गॅससिलिंडर आणि शेगडी सरकारकडून मिळाली. परंतु, ग्रामीण भागातील गरीब कुटुंबास सिलिंडर भरण्यासाठी पैसे नसल्याने ते रिफील करता येत नाही. त्यामध्ये अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे.
गॅस रिफील करता येत नाही आणि रेशनवरील रॉकेल देखील मिळत नाही. त्यामुळे महिलांना वाळलेले लाकूड, शेणाच्या गोवर्यांसाठी शेतावर फिरावे लागत आहे. स्वस्त धान्य दुकानातून धान्यासह रॉकेल मिळत होते. परंतु, गॅसचा लाभ घेतल्यामुळे दुकानातून मिळणारे रॉकेल बंद झाले. त्यामुळे महिला सरपण व गोवर्या गोळा करण्याकडे पुन्हा वळू लागल्या आहेत. सिलिंडरच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने ‘आपली चुलच बरी’ अशी भावना गरीब कुटुंबातील महिलांची झाली आहे.