पुणे

पिंपरीतील रुपीनगर शाळेला दुरुस्तीची प्रतीक्षा; विद्यार्थ्यांच्या मानाने अपुरी स्वच्छतागृहे

अमृता चौगुले

वर्षा कांबळे

पिंपरी : रुपीनगर याठिकाणी मराठी प्राथमिक व माध्यमिक तसेच उर्दू माध्यमिक व एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेला 20 ते 25 वर्षे झाली आहेत. याठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. वर्गखोलीच्या खिडक्या तुटलेल्या आहेत. मैदानातील लहान मुलांसाठी असलेली खेळणीदेखील तुटली आहेत. शाळेच्या मागच्या बाजूस गवत आणि कचर्‍याचे साम्राज्य आहे. शाळेची इमारत दुरुस्तीसह भौतिक सुविधांचा अभाव आहे.

महापालिकेच्या शाळांची वाटचाल स्मार्ट शाळांकडे सुरू आहे. रुपीनगर शाळेतील माध्यमिक विभागात सर्व वर्गखोल्यामध्ये एलईडी टीव्ही आणि प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत. वरच्या मजल्यांवर कुंड्यामध्ये शोभेची झाडे लावून शाळेचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, इमारतीची डागडुजी व रंगरंगोटीकडे दुर्लक्ष होत आहे. शाळांच्या भिंतीना तडे गेले आहेत. तर काही ठिकाणी भिंतींचे कोपरे फुटले आहेत. खिडक्या तुटलेल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या मानाने अपुरी स्वच्छतागृहे
शाळेमध्ये चारपैकी दोन स्वच्छतागृहे नादुरुस्त आहेत. सुटीचा मधला वेळ हा विद्यार्थ्यांची रिफ्रेशमेंट असते. शाळेची पटसंख्या 400 ते 500 आहे. दोनच स्वच्छतागृहे अपुरी असल्याने सुटीच्या वेळी मुलांचा बराच वेळ वाया जातो. त्यामुळे मुलांना जेवणाची किंवा खेळायच्या सुटीचा आनंद घेता येत नाही.

शाळेच्या आवारात पत्राशेड
महापालिकेच्या माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षण दिले जाते. या शाळेमध्ये ऑटोमोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी शाळेच्या मैदानात एका बाजूला पत्राशेड बांधण्यात आले आहे. यामध्ये एक नादुरुस्त कार आणि काही भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. शिक्षणाचा भाग म्हणून बांधण्यात आलेल्या या पत्राशेडमुळे शाळेचे सौंदर्य नाहीसे होत आहे. आधीच शाळेच्या मैदानात कर्मचार्‍यांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांमुळे जागा अडविली जाते. याबाबत शिक्षण उपायुक्त संदीप खोत यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

पाण्याच्या टाकीवर कुलूप नसलेले गंजलेले झाकण
शाळेच्या आवारात प्राथमिक शाळेसमोर पत्राशेडच्या मागे पाण्याची टाकी आहे. या टाकीचे झाकण गंजलेले असून कुलूप देखील नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे धोकादायक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT