पुणे

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Rupali Chakankar Resign NCP Women President

रणजित गायकवाड, पुढारी वृत्तसेवा

पुणे : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअऱ करत त्यांनी ही माहिती दिली आहे. याआधी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

'त्याच्या गैरकृत्याशी माझा संबंध नाही' - चाकणकर

रुपाली चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, "खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवसापासूनच मी माझी भूमिका मांडली आहे. संबंधित व्यक्तीच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात माझा दुरान्वयेही संबंध नाही. आजही माझी हीच भूमिका ठाम आहे. तपासादरम्यान सत्य काय आहे ते समोर येईलच."

सुनेत्रा वहिनींशी चर्चा आणि राजीनामा

या प्रकरणावर भाष्य करताना चाकणकर पुढे म्हणाल्या की, "कोणताही पुरावा नसताना माध्यमांमधून जे असत्य आरोप होत आहेत, ते अत्यंत वेदनादायक आहेत. आज सकाळी आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी फोनद्वारे सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर मी माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे."

पारदर्शक तपासाची मागणी

चाकणकर यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी केली आहे. "सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत हँडलला टॅग करत हा निर्णय जाहीर केला आहे. या राजीनाम्यामुळे आता खरात प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT