आरटीई प्रवेशाला आजपासून सुरुवात  Pudhari File Photo
पुणे

RTE Admissions: आरटीई प्रवेशाला आजपासून सुरुवात

14 ते 28 फेब्रुवारीदरम्यान प्रवेश घेता येणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: 2025-26 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळामध्ये आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. आरटीई 25 टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी शिक्षण आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली.

त्यानुसार आरटीई 25 टक्के प्रवेशासाठीची निवड यादी आज (दि. 14) जाहीर करण्यात येत आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी 14 ते 28 फेब्रुवारीदरम्यान संधी देण्यात आली असल्याची माहिती प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांनी दिली.

गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीई 25 टक्के लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांचे कागदपत्र पडताळणी करण्यासाठी तालुकास्तर व वॉर्डस्तरावर पडताळणी समिती स्थापन केली आहे.

लॉटरी झाल्यानंतर पडताळणी समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विद्यार्थ्यांचे नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे. त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी.

कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाइन नोंद करावी. तसेच पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला, असे नोंद करावे व ती नोंद करून पालकांना परत करावे. तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे. काही पालक मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर होण्याची शक्यता असते.

त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही, तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात. बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा. कागदपत्रे तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठित करण्यात यावी.

पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशाकरिता तीन संधी देऊनही पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर दिलेल्या मुदतीत आरटीई पोर्टलवर नॉट अ‍ॅप्रोच करावे. पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी व दिसते का याची खात्री करावी. पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेऊन पडताळणीविषयक कामकाज वेळेत होईल या द़ृष्टीने नियोजन करावे. पडताळणी समितीने रहिवासी पत्ता, गुगलवरील पत्ता व वय याची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्यांची करावी.

या द़ृष्टीने आवश्यक सुविधा गटशिक्षणाधिकारी स्तरावर करण्यात यावेत. प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे. मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.

...तर प्रवेश होणार रद्द

विद्यार्थ्यांनी खोटी, चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आरटीई 25 टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने नियमानुसार राबविली जात असून, प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश क्षमतेएवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड होणार आहे. पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील, तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT