गणेश खळदकर
Pune School: पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची कवाडे उघडणार्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी 18 डिसेंबरला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार असून, जानेवारी महिन्यात विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होईल.
तर, मार्च महिन्यात प्रवेशासाठीची लॉटरी जाहीर होईल. यंदा पहिल्यांदाच जून-जुलै महिन्यात संबंधित प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विशेषकरून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित जागांसाठी आरक्षित प्रवर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. संबंधित प्रवेश प्रक्रिया दरवर्षी उशिरा सुरू होते. त्यातच ऑनलाइन यंत्रणेतील दोष, शासनाकडून मान्यता देण्यास होणारी दिरंगाई अशा विविध कारणांमुळे
आरटीई प्रवेश प्रक्रिया रखडते. त्यामुळे एकीकडे डिसेंबर महिन्यात सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असली, तरी आरटीई प्रवेश प्रक्रियेला मात्र मुहूर्त लागत नव्हता. अखेर यंदा संबंधित प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.
2024-25 मधील शैक्षणिक वर्षांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया प्रथम चुकीच्या निर्णयामुळे, त्यानंतर कोर्ट कचेरी आणि पुनर्प्रक्रियेमुळे लांबली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे किमान यंदा तरी आरटीई प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती.
येत्या काळात सीबीएसई शाळेच्या शैक्षणिक वर्षाप्रमाणेच एसएससी बोर्डाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा विचार चालू आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार्या बर्याचशा इंग्रजी माध्यमाच्या शाळा या सीबीएसई बोर्डाच्या असल्याने महाराष्ट्रामध्ये आरटीई प्रवेश सुरू होण्यापूर्वीच खुल्या वर्गातील मुलांचे शिक्षण पुढे गेलेले असते. त्यामुळे आरटीई प्रवेश घेतलेल्या मुलांच्या मनात न्यूनगंड तयार होतो.
त्यामुळे सर्व परिस्थितीचा विचार करून शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू करून जून-जुलै महिन्यातच संबंधित प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे व्यवहार्य ठरणार आहे. त्यादृष्टीने यंदा प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पावले टाकली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘अधिकार्यांना प्रशिक्षण देण्याची गरज’
आरटीई प्रवेश प्रक्रियेत व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी करणारी समिती ही वेगवेगळ्या प्रकारे पालकांना कागदपत्रांची पूर्तता न केल्याचे कारण दाखवत प्रवेश नाकारतात. प्रतीक्षा यादीमधील मुलांना पैसे देऊन प्रवेश देण्याचे प्रकार घडतात. परंतु शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.
पडताळणी समितीवर एकापेक्षा अधिक सदस्य असणे तसेच त्यावर पालक संघटना, सामाजिक संघटना यांचे प्रतिनिधी असणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा यावर्षी आप पालक युनियन संबंधित अधिकारी या प्रकरणात गुंतल्याचे लक्षात आल्यास हे रोखण्यासाठी अनेक कायदेशीर मार्गांचा अवलंब करेल. याची समज सर्व अधिकार्यांना द्यावी.
त्यांना शिक्षण हक्क कायद्याचा उद्देश तसेच त्यामधील जन्मदाखला, स्पेलिंगमधील किरकोळ चुका, पत्त्यामधील तांत्रिक चुका याबाबत पडताळणी समिती आणि संबंधित अधिकार्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनाव्दारे शिक्षण विभागाकडे आप पालक युनियनच्या मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 18 डिसेंबरपासून शाळा नोंदणीला सुरुवात करण्यात येणार असून, मार्च महिन्यात विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्याचे तसेच जून-जुलै महिन्यातच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.- शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय.