विकासाचा मुद्दा दूर अन् नेत्यांना खूष करण्याचाच प्रयत्न; रोहित पवारांची टिप्पणी File Photo
पुणे

विकासाचा मुद्दा दूर अन् नेत्यांना खूष करण्याचाच प्रयत्न; रोहित पवारांची टिप्पणी

पुणे आंतरराष्ट्रीय व्यंग्यचित्र महोत्सवाला दिली भेट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: व्यंग्यचित्र प्रदर्शनातील एका चित्रात दर्शविल्याप्रमाणे पाणी वाया घालवून महिला मात्र नळकोंड्यावर भांडणे करीत आहेत त्याप्रमाणे सभागृहात आम्ही राजकारणी मंडळी विकासाचा मुद्दा बाजूला सारून, विरोधासाठी विरोध करताना किंवा नेत्याला खूष करण्याकरिता एकमेकांशी भांडत राहतो, अशी टिप्पणी आमदार रोहित पवार यांनी रविवारी (दि. 19) केली.

युवा संवाद सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून पुणे आंतरराष्ट्रीय व्यंग्यचित्र महोत्सवाचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला रविवारी पवार यांनी भेट देऊन व्यंग्यचित्रांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवाचे संयोजक, व्यंग्यचित्रकार धनराज गरड, लहू काळे, घनश्याम देशमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले, राजकारणी स्वत:च्या वागणुकीनेच व्यंग्यचित्रकारांना खुराक देऊन स्वत:ची एक छबी निर्माण करतात. तीच छबी व्यंग्यचित्रकार स्वत:च्या चित्रशैलीतून साकारतो आणि ती कायम राहते. असे होऊ नये म्हणून मी वारंवार माझी स्टाइल बदलत राहतो. पूर्वीचे नेते व्यंग्यचित्रांमधून झालेली टीका खेळीमेळीने स्वीकारायचे.

परंतु, आजच्या परिस्थितीत असे होताना दिसत नाही. एकाधिकारशाहीचा अंमल वाढल्यामुळे कलाकाराला व्यक्त होण्यास मर्यादा येत आहेत. राजकारणापेक्षा समाजकारण वाढविले तरी आम्हाला निवडणुकीत यश आले नाही. पुढील काळ आमच्यासाठी संघर्षाचा ठरणार आहे.

धनराज गरड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन किशोर गरड यांनी केले. लहू काळे, घनश्याम देशमुख, शरद महाजन, अमित पापळकर, हेमंत कुंवर, ऋषिकेश उपळावीकर या व्यंग्यचित्रकारांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. व्यंग्यचित्रकार गौरव सर्जेराव यांनी प्रात्यक्षिके सादर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT