पुढारी ऑनलाईन डेस्क: ट्रेनी आयएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर खेडकर कुटुंबिय अडचणीत आले. दरम्यान मनोरमा खेडकर यांना अटक केली असून, पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण देखील थांबवण्यात आले आहे. तसेच पूजा यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांना उत्तर द्या नोटीस बजावली आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी '...तरच पात्र, खऱ्या गुणवंतांना न्याय' अशी पोस्ट केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, " पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पारदर्शकतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असं होत असेल तर UPSC कडून दरवर्षी निवड झालेल्यांमध्ये उघड न झालेल्या अनेक #पूजा_खेडकर का असणार नाहीत?, अशी शंका या प्रकरणानिमित्त रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणानिमित्ताने बोगस भरती शोधून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. तरच पात्र आणि खऱ्या गुणवंतांना न्याय मिळेल. नाहीतरी वाळवी लागलेली संपूर्ण सिस्टीम आज सर्वसामान्य माणसालाच पोखरत असल्याचं दुर्दैवाने बघत बसावं लागत आहे, अशी भिती देखील रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
व्यवस्थेला लागलेली ही कीड कायमची दूर करण्यासाठी आतातरी सरकार पुढाकार घेणारा का? असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी ही पोस्ट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केली आहे.