अध्यक्षपदी निवड झाल्‍यानंतर कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांना उचलून घेत आनंद व्यक्‍त केला Pudhari Photo
पुणे

Rohit Pawar| महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवार बिनविरोध

सरचिटणीसपदी विजय बराटे : शरद पवारांचा वारसा रोहित पवारांकडे

पुढारी वृत्तसेवा

पुणेः सध्या महाराष्ट्रात राज्य कुस्तीगीर परिषदेचे दोन गट पडले असल्याचा पाहायला मिळत आहे. परिषदेच्या दुसर्‍या गटाची निवडणुक पार पडली असून या परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. परिषदेच्या सरचिटणीसपदी विजय बराटे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेली चाळीस वर्षे काम करत होते. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांनी चालणार्‍या या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक पैलवानांनी आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे. शरद पवार यांच्या याचे हेच काम पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता त्यांचेच नातू आमदार रोहित पवार यांच्यावर आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद ही राज्यातील सर्वांत जुनी संघटना आहे.

दोन वर्षांपूर्वी संघटनेची मान्यता आणि राजकारणाच्या घेर्‍यात अडकली. तसेच संघटनेची निवडणूक आणि वैधतेबाबतही प्रश्न निर्माण झाले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर संघ खरा की महाराष्ट्र कुस्तीगिर परिषद वैध याचा वाद थेट न्यायालयात पोचला होता. अखेर रविवार दि. 27 जुलै रोजी वारजे येथे महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या बोर्डाची निवडणूक झाली. यामध्ये आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान आमदार रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आयपीएलच्या धर्तीवर सलग तीन वेळा एमपीएल यशस्वीपणे भरवून राज्याच्या कानाकोपर्‍यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. तसेच गेल्यावर्षी अहिल्यानगर येथे महाराष्ट्र क्रिकेट संघाच्यामाध्यमातून भरवण्यात आलेल्या ’महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत वाद झाल्याने आणि या स्पर्धेच्या एकूणच वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आमदार रोहित पवार यांनी ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या’ मान्यतेने कर्जत येथे 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवली होती.

कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील मैदानी खेळ असून या कुस्तीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्यासाठी आणि राज्यातील गुणी व होतकरु पैलवानांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, स्व. मामासाहेब मोहोळ आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांच्या या संघटनेचं नेतृत्त्व करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतेय, हे माझं भाग्यच आहे. पवार साहेबांनी या संघटनेत केलेलं काम माझ्यापुढं दीपस्तंभाप्रमाणे असून यापुढेही आम्हाला सर्वांनाच त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. या निवडणुकीत बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व जिल्हा संघांचे मनापासून आभारी आहे.
रोहित पवार (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT