पुणे : एस. एम. जोशी पुलावर ठिय्या आंदोलन करणारे एमपीएससी विद्यार्थी. 
पुणे

Rohit Pawar Protest | हिंमत असेल तर विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा

आ. रोहित पवार यांचे आंदोलनातून जाहीर आव्हान

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आमदार रोहित पवार यांनी आंदोलनावर ठाम असल्‍याचे म्हटले आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार बोलून दाखवला. आम्हाला इथून हलवून दाखवा. हिंमत असल्यास विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा, असा इशाराही आ. रोहित पवार यांनी दिला. एमपीएससी आंदोलनाचा बुधवारी (दि. ७) सातवा दिवस होता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचा बुधवारी सातवा दिवस होता. आंदोलनामुळे पुण्यातील वातावरण तापले असून, एस. एम. जोशी पूल, लालबहादूर शास्त्री रस्ता आणि अलका चौक परिसरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नसल्याचे सांगत ५१ विद्यार्थी आणि २९ क्लासेस, अभ्यासिका चालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

अन्याय सहन करणार नाही

रोहित पवार म्हणाले, दोन निर्णयांचे अधिकार सरकारकडे आहेत. एक मित्राला घरी पाठवायचे किंवा पोलिसांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर अन्याय करायचा. त्यामुळे मित्राची बाजू न घेता मित्राला घरी पाठवा, विद्यार्थ्यांवरील अन्याय सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहा : बी. जी. कोळसे-पाटील

आंदोलनाला पाठिंबा देताना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना अन्यायाविरोधात आवाज उठवत राहाण्याचे आवाहन केले. शिक्षण हे अन्यायाविरोधात लढण्याचे साधन आहे, व्यवस्थेचे गुलाम बनण्यासाठी नव्हे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार करून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

आंदोलनात ८० टक्‍के गुंड; नवनाथ बन यांचा आरोप

पुण्यात सुरू असलेले आंदोलन हे एमपीएससी विद्यार्थ्यांचे नसून आमदार रोहित पवार यांनी प्रायोजित केलेला शुद्ध राजकीय कार्यक्रम आहे. या आंदोलनात केवळ २० टक्के निरागस विद्यार्थी असून, उर्वरित ८० टक्के बारामती ॲग्रोचे कर्मचारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व रोहित पवारांचे गुंड आहेत. ते दिवसभर मंचावर बसून भाषणे ठोकतात व मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत नाइट लाइफ एन्जॉय करत मुलींवरून राडे घालतात, असा खळबळजनक 'व्हिडीओ बॉम्ब' फोडत भाजयुमोचे नेते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

नवनाथ रोज आरोप करत सुटतात : विवेकानंद पाटील

नवनाथ बन हे दररोज आरोप करत सुटतात. नवनाथ संप्रदायातील नऊ नाथ कोणते आहेत आणि भागवत संप्रदायासोबत नवनाथ संप्रदाय काय आहे, हे सांगितले तर मी त्यांना उत्तर देतो, असे म्हणत विवेकानंद पाटील यांनी नवनाथ बन यांच्या बौद्धिक कुवतीवर प्रश्न उपस्थित केले. तसेच युवक काँग्रेसचे नेते शिवराज मोरे यांनी सांगितले की, नवनाथ बन यांच्यावर आम्ही अब्रुनुकसानीचा फौजदारी दावा ठोकणार असून, त्यांना थेट न्यायालयात खेचणार आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT