नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील कुंभार्डी येथे दरोडेखोरांनी दरोडा टाकून रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख 36 हजार रुपयांचा ऐवज लुटला. या वेळी दरोडेखोरांना प्रतिकार करताना दोनजण जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 5) मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. सुनील खंडु गोफणे, संदीप खंडु गोफणे अशी दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पूजा सुनील गोफणे (वय 29, तिघेही रा. कुंभार्डी, ता. जुन्नर) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभार्डी येथे फिर्यादी पूजा यांचे पती सुनील गोफणे तसेच कुटुंबीयातील अन्य सदस्य संदीप गोफणे, कल्पना संदीप गोफणे, दीपाली संदीप गोफणे, अंजना खंडु गोफणे हे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे झोपी गेले.
संबंधित बातम्या :
अडीचच्या सुमारास 5 दरोडेखोर गोफणेंच्या घरी आले. त्यांनी घराबाहेरील विजेचे दिवे वायर तोडून बंद केले. त्यानंतर पडवीत झोपलेल्या सुनील गोफणे यांना काठीने मारण्यास सुरुवात केली. या वेळी पूजा तेथे आल्या. त्यांनी आरडाओरड करत सुनील यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. आवाजाने घरात झोपलेले सर्वजण बाहेर आले. या वेळी एका दरोडेखोराने त्याच्याकडील लोखंडी रॉडने संदीप गोफणे यांच्या उजव्या पायावर मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर चाकूच्या धाकाने दरोडेखोरांनी पूजा यांच्यासह कल्पना, दीपाली व अंजना गोफणे यांच्या अंगावरील सोन्याचे एक लाख 25 हजार रुपयांचे दागिने व कपाटातील 11 हजार 300 रुपयांची रोकड लुटून नेत पलायन केले. जखमी झालेल्या संदीप यांना उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलिस उपनिरीक्षक अनिल पवार, रागिणी कराळे यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शिळीमकर यांनीही घटनास्थळी पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचरण करण्यात आले होते. आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बडगुजर हे पुढील तपास करत आहेत.