पुणे

दरोडे घालणारी टोळी जेरबंद; रांजणगाव – शिक्रापूर परिसरात टाकले होते 4 दरोडे

अमृता चौगुले

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील रांजणगाव व शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत दरोडे घालणारी टोळी जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व ग्रामीण पोलिसांच्या मदतीने जेरबंद करण्यात आली. रांजणगाव पोलिस स्टेशनचे हद्दीत बुरुंजवाडी येथे 3 डिसेंबर 2022 रोजी, सोनेसांगवी येथे 15 डिसेंबर 2022 रोजी, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे हद्दीत पिंपळे धुमाळ येथे 5 डिसेंबर 2022 रोजी व मुखई येथे 22 डिसेंबर 2022 रोजी सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडे टाकले होते. गुन्हे सलगपणे होत असल्याने ते रोखण्याचे व उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर होते. आरोपी तसेच त्यांची गुन्हा करण्याची वेळ सुध्दा एकसारखीच होती. आरोपी हे गुन्हा केल्यानंतर तेथील कोंबड्या चोरून नेत होते.

गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, अविनाश शिळीमकर, शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, रांजणगावचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, पोलिस उपनिरिक्षक गणेश जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, सहायक फौजदार तुषार पंदारे, मुकुंद कदम, जनार्दन शेळके, राजू मोमीन, शिक्रापूरचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, निखिल रावडे आदींची वेगवेगळी पथके तयार करून तपास केला.

गोपनीय बातमीदाराकडून वाडेगव्हाण, जि. अहमदनगर आणि कोळेगाव, जि. अहमदनगर येथे राहणारे इसमांनी अशाच पद्धतीने गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्यावरून संशयित आदेश काळे, वय 22 व सचिन काळे, वय 23, दोघे रा. मोहोरवडी, कोळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी त्यांच्या फरार साथीदारांसह रांजणगाव व शिक्रापूर पोलिस स्टेशनचे हद्दीत 4 दरोडे टाकल्याचे सांगितले. याप्रकरणी आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 16 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन, गुन्हा करताना वापरलेला लोखंडी कोयता, चाकू, लोखंडी कटावणी, 1 तोळा वजनाचे सोन्याचे शॉर्ट गंठण अशा वस्तू जप्त केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT