Robbery case latest news Pune
पुणे/धायरी: सिंहगड रस्त्यावरील श्री ज्वेलर्स या सराफ पेढीतील कामगारांना खेळण्यातील नकली पिस्तुलाचा धाक दाखवून 20 ते 22 तोळ्यांचे सुमारे 18 लाखांचे दागिने दरोडा टाकून चोरून नेले. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील धायरीत रायकर मळा आहे. संबंधित ठिकाणी काळूबाई चौकात श्री ज्वेलर्स नावाची सराफ पेढी आहे. दुकानमालक विष्णू दहिवाल आणि कामगार मंगळवारी (दि. 15) दुकानात होते. त्या वेळी दुपारी दुकानात वर्दळ कमी असताना एक अनोळखी व्यक्ती दुकानवरून तोंडाला मास्क लावून शिरला.
त्याने सोनसाखळी दाखवा, असे दुकानमालकाला सांगितले. त्यानंतर दुकानमालक सोनसाखळी दाखवत असतानाच आणखी दोन जण दुकानात शिरले. त्यांनी दुकानात शिरताच पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानमालक व कामगाराला धमकावले. त्यानंतर दुकानातील 20 ते 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्यांच्याजवळील पिशवीत टाकण्यास सांगितले.
काही मिनिटांच्या आत दागिने घेऊन पळून जाण्याच्या तयारीत दरोडेखोर असतानाच दुकानमालकाने या दरोडेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी या वेळी त्यांना मारहाण केली. झटापटीत पिस्तूलचा मागील भाग चोरटे मारहाण करत असताना तुटून खाली जमिनीवर पडला.
आर्श्चयाची बाब म्हणजे ती खरीखुरी पिस्तूल नसून ती खेळण्यातील नकली पिस्तूल असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घाईगडबडीत चोरटे दुचाकीवरून पसार झाले. याबाबतची घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास करत असताना आरोपींनी त्यांच्याकडील एक दुचाकी एक किलोमीटर परिसरात सोडून तेथून पुढे दुसर्या वाहनाने प्रवास केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, दुचाकी आणि ज्या वाहनातून चोरटे पुढे गेले, या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे. या दरोडेखोरांवर नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संभाजी कदम, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, नांदेड सिटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके रवाना केली आहेत.
पिस्तूल खरेदी केले होते का?
सध्या विविध गावखेड्यांमध्ये उत्सवाचे वातावरण सुरू आहे. या उत्सवात मोठ्या प्रमाणावर खेळण्यातील वस्तू येतात. नर्हे गावातही पुढील काही दिवसांत उत्सव आहे. आरोपींनी अशाच कोणत्या उत्सवातून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल खरेदी केले होते का? त्या अनुषंगानेही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.