पुणे; पुढारी वृत्तसेवा : नर्हे येथील वाइन शॉपच्या मालकाच्या हातातून पैशांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रकार दोन लुटारूंनी केला. मात्र, कामगार आणि नागरिक जमा झाल्याने लुटारूंनी हवेत गोळीबार केला आणि ते पसार झाले. ही घटना नर्हे येथील नवले हॉस्पिटलच्या मागील गेटजवळील हिरो वाइन्स परिसरात घडली.
याबाबत तुकाराम सोपान इंगळे (वय 57, रा. शिवणे, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात दोन अनोळखी लुटारूंविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम इंगळे यांच्या मालकीचे नर्हे परिसरात हिरो वाइन्स शॉप आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ते दुकान बंद करून गाडीत बसत होते. धायरी फाट्याच्या दिशेने एका दुचाकीवर दोघे आले.
पुढे बसलेल्या काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या व मागील बाजूस बसलेल्या पांढरा शर्ट घातलेल्या तरुणांनी दुचाकीवरून खाली उतरून इंगळे यांच्याजवळ येऊन पिस्तुलाचा धाक दाखविला. इंगळे यांच्या बॅगेतील 2 लाख 29 हजारांची रोकड हिसकाविण्याचा प्रयत्न केला.