File photo  
पुणे

पुणे : रस्ते अन् चौक फ्लेक्सने रंगले ! नगर रोड परिसरातील चित्र; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

अमृता चौगुले

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : नगर रोड, वडगाव शेरी, विमाननगर, चंदननगर, कल्याणीनगर आणि खराडी परिसरातील चौक फ्लेक्सने रंगले आहेत. फ्लेक्स कुठे लावावेत, याचे भानच कार्यकर्त्यांना राहिले नसून दिशादर्शक फलकही त्यातून सुटलेले नाहीत. आकाशचिन्ह विभागातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्वयंसेवी संस्था, संघटना, काही कार्यकर्त्यांनी फ्लेक्सचा विषय थेट न्यायालयापर्यंत नेला आहे. न्यायालयानेही त्याची दखल घेत महापालिकेला फ्लेक्ससंबंधी धोरण ठरविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे महापालिकेचा आकाशचिन्ह व परवाना विभाग कारवाई देखील करीत आहे. मात्र, तरी देखील परिसरात पुन्हा फ्लेक्सचे पेवच फुटले आहे. एकही गल्लीबोळ, चौक, मुख्य रस्ता सध्या असा शिल्लक राहिलेला नाही की जिथे फलक नाही.

चौकांमधील जागा अपुर्‍या पडतात म्हणून की काय आता दिशादर्शक फलकांवर फ्लेक्स लावण्याचा प्रकार सुरू झाला आहे. यामुळे दिशादर्शक फलक झाकले गेले आहेत. परगावाहून येणार्‍या वाहनचालक, प्रवाशांना पुण्यातील विविध ठिकाणांचे अंतर, दिशा माहिती होण्यासाठी मुख्य रस्त्यांवर कमानी तयार केल्या आहेत. त्यावरील माहिती दिसणार नाही अशा पद्धतीने सध्या या भागात फलक लावण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर रस्त्याच्या कडेने बाबूंच्या चौकटी उभ्या करूनही फ्लेक्स लावण्यात आले आहेत. एकाने केली म्हणून त्याच्याशेजारी लगेचच प्रतिस्पर्धी कार्यकर्त्यांनी त्यापेक्षा जास्त आकाराची मोठी चौकट उभारून त्यावर फ्लेक्स लावले आहेत. काही प्रमुख चौकांत रस्त्याच्या कडेने मंडप टाकल्याप्रमाणे फ्लेक्सच्या चौकटी उभारण्यात आल्या आहेत.

दिशादर्शक आणि महापुरिषांच्या फलकांसमोर फ्लेक्स लावले जातात. महापालिका प्रशासन या फ्लेक्सवर कारवाई करीत नाही. फ्लेक्सबाबत मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये मी तक्रार केली आहे. पण, अद्याप कारवाई झाली नाही. परिसराचे विद्रूपीकरण करणार्‍या फ्लेक्सवर कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
                             – दत्तात्रय सोंडेकर, अध्यक्ष, मातोश्री सेवा प्रतिष्ठान

परिसरातील अवैध फ्लेक्सवर वेळोवेळी कारवाई केली जात आहे. आतापर्यंत कारवाई करून सुमारे चार लाखांचा दंड केला आहे. लवकरच सर्व फ्लेक्सवर कारवाई केली जाईल.
      – संजय शिवले, अधिकारी, आकाशचिन्ह विभाग, नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT